जळगाव - लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणार्या विवाहित युगुलाला महिलेच्या सासरच्या मंडळींनी विवस्त्र करून रविवारी बेदम मारहाण केली होती. मात्र, या प्रकरणी पोलिसांनी चार दिवसांनी बुधवारी 13 जणांवर गुन्हा दाखल करून 11 जणांना अटक केली आहे. न्यायालयाने या सर्वांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
खडक देवळा गावातील प्रवीण पाटील आणि याच गावातील एक 28 वर्षीय विवाहित महिला हे दोघे पाचोर्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मात्र, हा प्रकार महिलेच्या सासरच्या लोकांना रुचला नाही. त्यामुळे रविवारी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास प्रवीण व सदर महिलेला त्यांच्या घरी नेऊन बांधून व विवस्त्र करून बेदम मारहाण केली होती.
जखमी अवस्थेतील पीडित युगुलाने त्याचवेळी पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार देण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनीही मारहाण करणार्यांवर कारवाई केली नव्हती. अखेर चार दिवसांनी माध्यमांनी हे प्रकरण उघडकीस आणल्यानंतर पोलिसांना जाग आली. जखमी अवस्थेतील दोघांचेही रुग्णालयात जाऊन जबाब घेत 13 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले व त्यापैकी 11 जणांना अटक करण्यात आली.