आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थाप मारुनी थापाड्या गेला, कुठे कुठे शोधू तुला!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जामनेर (जि. जळगाव) - फेसबुकच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली. व्हॉट्स अँपने अधिक जवळ आणले. त्यानंतर कुटुंबीयांना या ‘सोशल’ प्रेमाची कुणकुण लागली. मात्र, त्यांनी पुण्यात दुसर्‍याशीच मुलीचे लग्न लावून दिले. परंतु लग्नानंतरही तिची प्रियकरासाठी ओढ कमी झाली नाही. त्याच ओढीतून तिने सासरचे दागिने घेऊन प्रियकराबरोबर पळ काढला; परंतु प्रियकर दगाबाज निघाला. त्याने दागिने विकून तिला जामनेरजवळील पळसखेड्यात सोडून दिले. त्याच्या शोधासाठी ही तरुणी वणवण भटकंती करत होती. या प्रकरणाची माहिती कळताच पोलिसांनी तिला वडिलांच्या ताब्यात दिले आहे.

मुंबईतील वैद्यकीय महाविद्यालयात बीएएमएसच्या द्वितीय वर्षाला असलेल्या या युवतीची ओळख जामनेरातील युवकाशी ‘फेसबुक’च्या माध्यमातून झाली. त्यानंतर फोनवरून गप्पा, व्हॉट्स अँपच्या माध्यमातून संदेशांची देवाण-घेवाण सुरू झाली. मुलीचे हे प्रताप आई-वडिलांना माहिती झाले. त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून पुण्यातील एका युवकाशी तिचा विवाह लावून दिला. सदर तरुणी दोन महिने सासरी नांदली. त्या काळातही तिचा प्रियकराशी दूरध्वनीवरून संवाद सुरूच होता. एकेदिवशी तिने सासरहून दागिने, पैसे घेऊन पलायन केले व थेट प्रियकराकडे आली. मात्र, त्याने हे दागिने विकून पैसे लाटले व नंतर दोघेही जामनेरात आले.

सिमकार्डची कागदपत्रे बनावट
जामनेरातील या तरुणाकडे चार ते पाच सिमकार्ड होते. परंतु त्यासाठी असलेली कागदपत्रेही बनावट होती. त्यामुळे पोलिसांना त्याचे लोकेशन शोधण्यात अडचणी येत आहेत.

प्रेमात फसवणूक
‘माझ्या घरच्यांचा लग्नास विरोध आहे; त्यामुळे दोन दिवस तू गावात थांब’, असे सांगून प्रियकर तिला पळसखेडा बुद्रुक गावाजवळ सोडून निघून गेला. नंतर त्याचा काहीच संपर्क झाला नाही. जवळ पैसे नाहीत, मोबाइल बॅलन्सही संपले, अशा विचित्र परिस्थितीत ती तरुणी प्रियकराच्या शोधात गावात फिरत होती. ग्रामीण भागात स्लीव्हलेस टॉप व स्किन टाइट जिन्स घातलेली तरुणी पाहून चर्चा होऊ लागली. एका महिलेला तिची व्यथा समजली. तिच्याच घरी तरुणीने दोन दिवस आर्शय घेतला. अखेर प्रकरण पोलिसांपर्यंत गेले व मंगळवारी सकाळी तिचे वडील मुंबईहून जामनेरला येऊन तिला घेऊन गेले.