आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तंबाखूमुक्त शाळांमध्ये राज्यात जळगाव अव्वल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शाळांमध्ये'तंबाखूमुक्त अभियाना'ची अंमलबजावणी करण्यात राज्यात जळगाव जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ९६ टक्के शाळा तीन महिन्यांतच तंबाखूमुक्त झाल्या आहेत.

राज्य शासनाने जुलै २०१५ला अध्यादेश काढून शाळेचा परिसर तंबाखूमुक्त करण्याचे आदेश काढले हाेते. त्यानंतर त्याची अंमलबजावणी होत नव्हती. यामुळे व्हाइस ऑफ टोबॅको व्हिक्टिम या आंतरराष्ट्रीय एनजीओ संस्थेचे प्रतिनिधी डॉ.गोविंद मंत्री यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांना हे अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी उपाय योजना सूचवल्या. सीईओ पाण्डेय यांनी अभियानाची गती वाढवत गटविकास अधिकारी, शिक्षणाधिकारी,गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन अभियान यशस्वितेसाठी सूचना केल्या. तीन महिन्यांत जिल्ह्यातील एक हजार ८५१ शाळांपैकी एक हजार ७८३ प्राथमिक शाळांमध्ये हे अभियान यशस्वीपणे राबवले गेले. तसेच डॉ.मंत्री यांनी लहान मुलांना तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामांपासून वाचवण्याविषयीचे प्रत्येक शाळेत जाऊन प्रबोधन केले. शाळेच्या दर्शनी भागांवर तंबाखूचे दुष्परिणाम सांगणारे फलक लावण्यात आले आहेत. शाळेच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी घातली आहे.

अंमलबजावणीसाठी पाठिंबा
कायदाझाला; पण त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नव्हती. या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणीसाठी डॉ.गोविंद मंत्री यांनी जिल्ह्यातील १३ आमदार दोन खासदारांच्या पाठिंब्यासह राज्यातील १०५ आमदार १४ खासदारांचा पाठिंबा मिळवला.

कठोर अंमलबजावणीसाठी प्रयत्न
शालेय विद्यार्थ्यांना तंबाखूसह अन्य व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी माझे कार्य सुरू आहे. जिल्ह्यात हे अभियान यशस्वीपणे राबवण्यात आले आहे. यासह व्हाइस ऑफ टोबॅको व्हिक्टिम या संस्थेच्या माध्यमातून कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसाठी प्रयत्न करू.
डॉ.गोविंदमंत्री, तंबाखूमुक्त अभियान प्रचारक

शाळांना प्रमाणपत्रासह बक्षिसे
बहुतांश शाळांमध्ये आदेशानुसार जनजागृतीचे काम पूर्ण झाले आहे. अनेक शाळांत प्रत्यक्ष भेटी देऊन ही पाहणी केली आहे. यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शाळांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येत आहे. बक्षिसेही देण्याचे नियोजन आम्ही करीत आहोत. - आस्तिककुमार पाण्डेय, सीईओ जि.प.