आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon District Bank Cut 40 Lakh Rupee From Staff Increment

जळगाव जिल्हा बॅँक कर्मचार्‍यांच्या पगारवाढीतून कापले 40 लाख रुपये

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या कर्मचारी आणि अधिकार्‍यांना लागू केलेल्या अतिरिक्त भत्त्यांतून ‘संघटना निधी’च्या नावाने एका महिन्याच्या फरकाची रक्कम परस्पर कापून घेण्यात आली असून, त्यामुळे कर्मचारी आणि अधिकार्‍यांना 40 लाख 74 हजार रुपयांचा फटका बसला आहे. त्यातील 40 लाख 50 हजार रुपयांची रक्कम अन्य खात्यात वर्ग करण्यात आली आहे.


बॅँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांनी विविध भत्त्यांच्या रकमा व्यवस्थापक ते अटेंडंट र्शेणीच्या कर्मचार्‍यांना देण्याबाबत 24 ऑगस्ट 2013 रोजी परिपत्रक जारी केले होते. त्यात र्शेणीनिहाय कर्मचार्‍यांच्या वेतनात एप्रिल 2013पासून 6 हजार ते 1 हजार रुपयांपर्यंतचे इतर भत्ते वाढवण्यात आले आहेत. तसेच जुलै 2013च्या पगारात चार महिन्यांच्या फरकाची रक्कमही अदा करण्यात आली. या संदर्भात बॅंकेचे संचालक प्रदीप देशमुख यांनीच लेखी विरोध केला असून तो आता गाजणार आहे.


तीन टप्प्यांत 40.5 लाख वर्ग
संघटनेच्या या चालू खात्यातून 2 सप्टेंबरला 25 लाख, 6 सप्टेंबरला 12 लाख आणि 18 सप्टेंबरला साडेतीन लाख रुपये अन्य खात्यात वळते करण्यात आले आहेत. संघटना चालवत असलेल्या पतसंस्थांचे हे खाते आहे, असे सांगण्यात येते आहे.


सर्वसाधारण सभेची संमती आवश्यक
अशा प्रकारे संघटना निधी उभा करायचा असेल आणि त्यासाठी कर्मचार्‍यांच्या वेतनातून रक्कम कापायची असेल, तर संघटनेच्या सर्वसाधारण सभेत तसा ठराव करणे कामगार संघटना कायद्यान्वये बंधनकारक आहे.

सुटीच्या दिवशी उघडले खाते
या फरकाच्या रकमेपैकी 40 लाख 73 हजार 962 रुपये ‘सेंट्रल को-ऑप. बॅँक स्टाफ युनियन’ या नावाच्या चालू खात्यात परस्पर वर्ग करण्यात आले आहेत. त्यासाठी हे खाते चक्क 15 ऑगस्ट 2013 रोजी उघडण्यात आले आहे. राष्ट्रीय सुटीच्या दिवशी खाते उघडण्याची दाखवलेली तत्परता उल्लेखनीय आहे. संघटनेच्या पोटनियम 24नुसार ही कपात करण्यात येत असल्याचे कार्यकारी संचालकांनी आपल्या परिपत्रकात म्हटले आहे. 1 एप्रिल 2013नंतर सेवानिवृत्त झालेल्यांनी फरकाच्या रकमेच्या 10 टक्के रक्कम संघटनेच्या खात्यात जमा करण्याचे निर्देशही या आदेशान्वये देण्यात आले आहेत.

लेखी विरोध केला आहे
कर्मचार्‍यांच्या पगारातून पैसेकपातीसंदर्भात संचालक मंडळाच्या बैठकीत मी लेखी विरोध केला आहे. तसेच त्यासंदर्भात शासनाशीदेखील पत्रव्यवहार केला आहे. प्रदीप देशमुख, संचालक, जिल्हा मध्यवर्ती बॅँक


कर्मचार्‍यांची लेखी संमती आवश्यक
‘युनियन फंडा’ बाबतचे आदेश प्रशासनाकडून काढले गेल्यास कर्मचार्‍यांची लेखी संमती असणेही आवश्यक असते. एकादेखील कर्मचार्‍याचा विरोध असला तर तसे करता येत नाही. संजय राऊत, जिल्हा उपनिबंधक.