आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव : मुर्‍हे खून खटल्यातील चारही आरोपी निर्दोष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - दवाखाना उभारण्यासाठी माहेरून पैसे आणावेत ही मागणी पूर्ण न केल्यामुळे सुशिक्षित पत्नीचा खून केल्याचा आरोप असलेल्या शहरातील शिवकॉलनीत डॉ. जितेंद्र मुर्‍हेसह त्याच्या कुटुंबीयांना न्यायालयाने बुधवारी निर्दोष मुक्त केले. वैद्यकीय आधारावर आपण संशयित आरोपींना मुक्त करीत आहोत, असे निकालपत्रात नमूद करणार्‍या न्यायाधीश पी.बी.आंबेकर यांनी निकाल वाचून दाखवताना अनेक सामाजिक आणि नैतिक मुद्यांचाही उहापोह केल्याने हा निकाल चर्चेचा ठरला आहे.
21 मे 2011 रोजी वर्षा जितेंद्र मुर्‍हे (वय 23) ही विवाहित तरुणी तिच्याच शिवकॉलनीतील घरात मृतावस्थेत आढळली होती. पैशांची मागणी पूर्ण न करू शकल्यामुळे तिचा गळा आवळून खून केल्याचा आरोप तिचे वडील जानकीराम नथ्थू पाटील यांनी सासरच्यांवर ठेवला होता. त्यात वर्षाचा पती डॉ. जितेंद्र, त्याचे वडील प्रा.मधुकर मुर्‍हे, आई प्रमिलाबाई आणि विवाहीत बहीण जयश्री सुभाष धायडे यांचा समावेश होता. भादंवि कलम 302, 498, 201 आणि 34 प्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल होता. त्यांना अटक केल्यानंतर जामीन मंजूर न झाल्याने अडीच वर्षे न्यायालयीन कोठडीत राहावे लागले.
या गुन्ह्यात मयत वर्षा हीने गळफास घेतला की तिचा गळा आवळला, या मुद्यावर दोन्ही पक्षाचे युक्तिवाद झाले. सरकारपक्षाने 9 साक्षीदार तपासले. संपूर्ण खटला वैद्यकीय पुराव्यांच्या आधारावर होता. गळफास घेणे आणि गळा आवळणे, यात वैद्यकीयदृष्ट्या फार थोडे अंतर असल्याचे मत न्यायाधीशांनी व्यक्त केले. वैद्यकीय पुरावा कोणत्या बाजूला झुकतो, याचा विचार करणे न्यायालयाला गरजेचे होते आणि पुरावा बर्‍याच अंशी मयताने स्वत:हून गळफास घेतला अशा निर्णयाप्रत न्यायालय आले असल्यामुळे आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचा निर्णय घेतल्याचे न्यायाधीशांनी स्पष्ट केले. खटल्यात आरोपींतर्फे अ‍ॅड.अ.वा.अत्रे तर सरकारपक्षातर्फे अ‍ॅड.सुरेंद्र काबरा यांनी काम पाहिले.

अपिलात जाणार
वर्षाच्या मृतदेहाच्या पाहणीवरून तिच्या मानेवर व्रण होते. याचा अर्थ कापड किंवा दोरीने तिचा गळा आवळण्यात आला असल्याचा आरोप तिच्या परिवारातील सदस्यांनी कायम ठेवला आहे. जिल्हा न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात अपिलात जाणार असल्याचे त्यांनी निकालानंतर स्पष्ट केले.


अनेक मुद्दे केले उपस्थित
न्यायाधीश पी.बी. आंबेकर यांनी निकालपत्र वाचून दाखवले. यात त्यांनी न्यायालयीन कामकाजातील आणि समाजातीलही अनेक नैतिक मुद्यांवर बोट ठेवले. ते म्हणाले की, न्यायालय जर एखाद्या मुद्याचा सर्वबाजूंनी विचार करीत असेल तर तो करू दिला पाहिजे. सर्वच क्षेत्रात संशोधन सुरू असताना गुन्ह्याच्या बाबतीत न्यायालयाने सर्व बाजूंनी विचार करून मत तयार करणेच योग्य आहे. ज्ञान व माहिती यात फरक आहे. माहिती संपल्यावर ज्ञान सुरू होते. एखादे पुस्तक 100, 200 वेळा वाचले तरी, ते केवळ पुस्तकी ज्ञान असते. शवविच्छेदन करणार्‍या डॉक्टरांनी मृतदेहाचे अवयव हाताळून मत तयार केलेले असते. त्यामुळे त्यांच्या ज्ञानावर शंका घेतली जाऊ नये. संशयिताना जामीन मिळाला नाही, खटला अंडरट्रायल चालला तर न्यायालय संशयितांच्या बाबतीत पूर्वग्रह दूषित आहे, असा विचार करणे चुकीचे आहे. युक्तिवादात महिलांविषयी विधाने करताना महिला वर्गाचा अपमान होणार नाही, याची काळजी घेतली गेली पाहिजे. मुलीला त्रास होत असेल आणि तो तिने सांगितला असेल तर तिच्या माहेरच्यांनी आणि समाजातील अन्य घटकांनीही आधीच योग्य ती काळजी घेऊन तिला जपण्याचा प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असेही न्यायालयाने निकाल वाचून दाखवताना नमूद केले.