आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षण मंडळाचे पत्र पालिकेसाठी कचराच, पाच वर्षांपासून वारंवार पत्र देऊनही टाळाटाळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या कार्यालयासमोर जुने नटवर थिएटर पाडून नवीन कॉम्प्लेक्स उभारणीचे काम झाले आहे. कॉम्प्लेक्सच्या तळमजल्यावरील वाहनांसाठी रस्ता तयार करतांना पालिकेच्या 25 नंबर शाळेची भिंत तोडून पालिकेच्या जागेचा वापर केला जात असल्याची तक्रार आहे. यासंदर्भात मंडळाने पाच वर्षांपासून मागणी करूनही मोजमाप करण्याची तसदी पालिका प्रशासनाने घेतलेली नसून पत्राला कचर्‍याचीच किंमत दिली जाते आहे.
शहरातील सिटी सर्व्हे नंबर 2118/ 2 मध्ये पालिकेची शाळा क्रमांक 25 आहे. या ठिकाणी शिक्षण मंडळाचे कार्यालय, अपंग समावेशित प्रशिक्षण शाळा, सर्व शिक्षा अभियानाचे कार्यालय देखील आहे. अत्यंत मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पालिकेच्या या मालमत्तेच्या समोर नटवर थिएटर होते. थिएटर पाडल्यानंतर या ठिकाणी चार मजली कॉम्प्लेक्स उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तळमजल्यावर वाहन पार्किंगची सोय करण्यात आली असून वाहने बाहेर निघण्यासाठी दोन्ही बाजूंनी जागा सोडलेली आहे. शिक्षण मंडळ कार्यालयाच्या समोरील बाजूकडून सोडलेल्या जागेतून वाहने निघणे शक्य नसल्याने 25 नंबर शाळेच्या प्रवेश कमानीची भिंत तोडून त्या ठिकाणी रॅम्प तयार केला आहे. हे पालिकेच्या जागेत अतिक्रमण असल्याची शंका आल्याने पाच वर्षापूर्वीच तत्कालीन प्रशासन अधिकार्‍यांनी यासंदर्भात नगररचना विभागाच्या सहायक संचालकांकडे पत्रव्यवहार करत डिमार्केशन करून मिळण्याची मागणी केली होती. पहिल्या पत्रावर कारवाई झाली नाही म्हणून सहा महिन्यांच्या अंतराने पुन्हा पत्र दिले होते. त्यांच्या बदलीनंतर याप्रकरणाकडे कुणीही लक्ष दिले नाही.

बांधकाम पूर्णत्वानंतर पुन्हा पत्र
शिक्षण मंडळाच्या समोरील कॉम्प्लेक्सचे बांधकाम पूर्णत्वास आलेले आहे. पाच वर्षात नगररचना विभागाने मोजमाप करून दिलेली नाही. ही बाब लक्षात आल्याने गेल्या आठवड्यात विद्यमान प्रशासन अधिकार्‍यांकडून या संदर्भात पुन्हा नगररचना विभागाला पत्र दिले गेले आहे. आता तरी पालिका प्रशासनाने मंडळाच्या अधिकार्‍यांचे पत्र गांभीर्याने घेण्याची अपेक्षा आहे.

तक्रारीत तथ्य नसल्याचा दावा
पालिकेत रितसर बांधकाम परवानगी घेऊन आम्ही बांधकाम केले आहे. बांधकाम पूर्णत्वाचा दाखलाही आम्हाला मिळाला असून शिक्षण मंडळाच्या अधिकार्‍यांच्या तक्रारीत मुळीच तथ्य नाही, सर्व बांधकाम परवानगी घेऊन आणि नियमानुसारच केलेले आहे. या संदर्भात मोजमाप झाल्यास वस्तुस्थिती नक्कीच समोर येईल.
मेहुल त्रिवेदी, जागा मालक

हक्काची जागा समजून वाहन पार्किंग
शिक्षण मंडळाचे कार्यालय असलेल्या शाळा क्रमांक 25 मध्ये विद्यार्थ्यांसाठी क्रीडांगणाची जागा आहे. या ठिकाणी पालिकेचे जेसीबी, नाला एक्सेव्हेटर लावले जातात. या व्यतिरिक्त परिसरातील मोठ्या व्यावसायिकांच्या कार पार्किंग या ठिकाणी केल्या जातात. दिवसेंदिवस या जागेचा गैरवापर वाढत आहे.


आतातरी हालचाली व्हाव्यात
आरोग्य, अतिक्रमण विभागाच्या अधिकार्‍यांवर उपमहापौर यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे नगररचना विभागाचे अधिकारी हालचाली करतील अशी अपेक्षा आहे.

शिक्षण मंडळातील अधिकार्‍यांकडून मोजणी संदर्भात यापूर्वी काही पत्रव्यवहार झाला असल्यास त्याची मला कल्पना नाही. त्यांच्याकडून लेखी तक्रार असल्यास मोजणी करून देण्यास आम्ही आजही तयार आहोत.
चंद्रकांत निकम, सहायक संचालक, नगररचना