आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव महापालिकेच्या तिजोरीवर सव्वा कोटीचा ताण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - आर्थिक अडचणीत असताना पार पाडाव्या लागलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमुळे महापालिकेच्या तिजोरीवर सव्वा कोटी रुपयांचा ताण पडला आहे. दरम्यान, निवडणुकीपूर्वी दोन कोटींपर्यंत खर्च लांबण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती; मात्र काटकसरीमुळे हा खर्च आटोक्यात ठेवण्यात प्रशासनाला यश आले आहे.

पालिकेची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया पार पडली असून, राजकीय पक्षांसह पालिका कर्मचारी व अधिकार्‍यांनीही मोकळा श्वास घेतला आहे. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या पालिकेच्या तिजोरीवर अतिरिक्त पडणारा निवडणूक खर्च पेलण्याचे आव्हान प्रशासनासमोर होते. त्यामुळे तीन महिन्यांपूर्वीच या निवडणुकीसाठी प्रशासनातर्फे विशिष्ट निधी राखून ठेवण्यात आला होता. निवडणूक प्रक्रियेदरम्यान कर्मचार्‍यांना मानधन व भत्ते, वाहन, मतदान केंद्र देखभाल-दुरुस्ती, पोलिस बंदोबस्त, छायाचित्रण, राज्य वखार महामंडळाच्या गोदामांचे भाडे यासह विविध बाबींसाठी प्रचंड खर्च करावा लागतो. वाढलेल्या महागाईनुसार हा खर्च दोन कोटी रुपयांच्या घरात जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. आता निवडणूक प्रक्रिया पार पडल्याने झालेल्या खर्चाची जुळवाजुळव प्रशासनाकडून केली जात असून, हा खर्च सव्वा कोटी रुपयांदरम्यान जाण्याची शक्यता आहे.

थांबवून ठेवलेले दोन अधिकारी जाणार
सहायक आयुक्त अविनाश गांगुर्डे यांची स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून नायब तहसीलदार म्हणून पुणे जिल्ह्यात नियुक्ती करण्यात आली होती. तसेच मुख्य लेखापरीक्षक प्रवीण पंडित यांचीदेखील नियमित बदली झाली होती; मात्र महापालिका निवडणूक काळात सक्षम सहकारी हवे असल्याने या दोन्ही अधिकार्‍यांना थांबवून ठेवण्यात आले होते. आता निवडणूक प्रक्रिया आटोपल्याने दोघा अधिकार्‍यांचा नियुक्त केल्याच्या ठिकाणी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कर्मचार्‍यांनी घेतला मोकळा श्वास
नवीन प्रभागरचना तयार करणे, मतदार याद्यांची प्रसिद्धी व आलेल्या हरकतींनुसार त्यात बदल करणे आदी सर्व प्रक्रियेसाठी पालिकेचे 600 कर्मचारी व अधिकारी तीन महिन्यांपासून राबत होते. तसेच निवडणूक प्रक्रियेत गुंतलेल्या कर्मचार्‍यांच्या अखेरच्या टप्प्यात सुट्या रद्द करण्यात आल्या होत्या.

तीन हजार अधिकारी-कर्मचारी
निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी 2 हजार 900 अधिकारी व कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच मतदान प्रक्रियेसाठी 120 वाहनांचा वापर झाला. याव्यतिरिक्त पालिकेच्या विविध 30 वाहनांचाही निवडणुकीच्या कामासाठी वापर करण्यात आला.

कर्मचार्‍यांचे पगार रखडले
प्रशासनातर्फे निवडणूक खर्च लक्षात घेऊन दोन महिन्यांपूर्वी काही रक्कम वेगळी काढण्यात आली होती. आर्थिक स्रोत कमी असताना निवडणुकीसाठी वेगळी तरतूद करावी लागल्याने पालिका कर्मचार्‍यांच्या पगाराचे वेळापत्रक दोन महिन्यांपासून बिघडले होते. काही विभागांचा जुलै महिन्याचा पगार अद्यापही झालेला नाही.