आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जैन-देवकरांची अनुपस्थिती कोणाच्या पथ्यावर?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - जळगावच्या राजकारणात गेल्या पंचवीस वर्षांपासून ज्यांची ‘दादा’गिरी आहे ते शिवसेनेचे आमदार सुरेश जैन आणि राष्ट्रवादीचे आमदार गुलाबराव देवकर हे दोघे मातब्बर सध्या घरकुल घोटाळाप्रकरणी तुरुंगात आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत यंदा जळगाव लोकसभेचे चित्र काय राहील, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. भाजपने विद्यमान खासदार ए. टी. पाटील यांनाच पुन्हा संधी दिली, तर राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकरांना रिंगणात उतरवण्याची तयारी होती. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर ते तुरुंगात गेल्याने अखेर माजी आमदार डॉ. सतीश पाटील यांना रिंगणात उतरवण्यात आले.

जळगाव लोकसभेत शहर, ग्रामीण, पारोळा-एरंडोल, पाचोरा-भडगाव, अमळनेर आणि चाळीसगाव या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात 1996 मध्ये भाजपचे एम. के. पाटील विजयी झाले आणि त्यानंतर 2007 च्या पोटनिवडणुकीचा अपवाद वगळता आजतागायत हा मतदारसंघ भाजपकडेच आहे. गेल्या वेळी ए. टी. पाटील यांना राष्ट्रवादीतून आयात करून भाजपने उमेदवारी दिली तरीही ते निवडून आले होते.

खान्देश आघाडी विभागली
खासदार ए. टी. पाटील यांनी केलेली लहान-मोठी कामे व इतर कार्यक्रमांतून सातत्याने मतदारसंघात संपर्क ठेवला. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनीही त्यांच्या विजयाची जबाबदारी घेतली आहे. ए. टी. पाटील यांची स्वत:ची वेगळी यंत्रणा नाही. भाजपला एकही आमदार मतदारसंघात नाही. मित्रपक्ष शिवसेनेचे आमदार सुरेश जैन तुरुंगात आहेत. गतवेळी त्यांची मोठी मदत झाली होती; पण या वेळी शिवसेना अनेक कारणांनी दूर आहे. जैनांच्या सर्वपक्षीय खान्देश विकास आघाडीचे काही नगरसेवक राष्ट्रवादीचा, तर काही भाजपचा प्रचार करत आहेत.

ए. टी. पाटील
बलस्थाने : विद्यमान खासदार असल्यामुळे प्रत्येक तालुक्यात वैयक्तिक संपर्क, एकनाथ खडसे यांची संपूर्ण मदत, आर्थिकदृष्ट्या सक्षम, मोदी लाटेचा प्रभाव, विरोधी पक्षातील नाराजांची मदत, उमेदवारी निश्चितीमुळे तयारीला मिळालेला वेळ.

उणिवा : कार्यकर्त्यांची फळी नाही, सुरेश जैन यांचा पाठिंबा मिळवण्यात या वेळी अपयश, शिवसेनेत कमालीची नाराजी, संपर्क न ठेवल्याच्या काही भागातून आहेत तक्रारी, मोदी लाटेशिवाय प्रचाराचा दुसरा ठोस मुद्दा नाही, खडसे रावेरात अडकल्यास जळगावात होईल दुर्लक्ष.

राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. सतीश पाटील हेही पारोळ्याचेच. तालुक्यात त्यांच्या विविध शैक्षणिक संस्था, नातेगोते व पक्षाचे संघटनही चांगले आहे. जिल्ह्याचे माजी पालकमंत्री म्हणूनही त्यांचा प्रभाव आहे. राष्ट्रवादीचे नेते विद्यमान खासदाराच्या कारभाराचा पंचनामा करण्याबरोबरच मोदींच्या गुजरात मॉडेलवर टीका करून मतदारांचे लक्ष वेधत आहेत. मतदारसंघात राष्ट्रवादीचे तीन आणि एक सर्मथक आमदार असले तरी वैयक्तिक वाद व गटबाजीचा फटकाही त्यांना बसू शकतो.

डॉ. सतीश पाटील
बलस्थाने : माजी मंत्री असल्याचा प्रभाव, आमदार राहिलेले वडील भास्करराव पाटील यांची पुण्याई, तालुक्यात शैक्षणिक संस्थांचे जाळे, चार आमदारांचे पाठबळ, स्वत: जिल्हा बँकेचे संचालक, संपूर्ण मतदारसंघात नातेगोते आणि कार्यकर्त्यांची फळी

उणिवा :मंत्री असताना गत विधानसभा निवडणुकीतील पराभव, पक्षर्शेष्ठींच्या आदेशानुसार ऐनवेळी करावी लागलेली उमेदवारी, भाऊबंदकीच्या वादाचा फटका, काँग्रेस पदाधिकार्‍यांची नाराजी, जिल्हाभरात वेगवेगळ्या ठिकाणी राष्ट्रवादीतील गटबाजी