आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजेच्या धक्क्याने बालकाचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - इलेक्ट्रिक खांबाचा धक्का लागल्याने खांबामध्ये उतरलेल्या वीजप्रवाहामुळे एका सात वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास चित्रा चौकातील पोलनपेठमध्ये घडली. क्रॉम्प्टन कंपनीच्या गलथानपणामुळे हा प्रकार घडला असल्याची तक्रार या परिसरातील नागरिकांनी केली आहे.

हॉटेल काशीनाथजवळील रहिवासी असलेल्या निफाडकर यांच्या कुटुंबातील दर्पण समीर निफाडकर (वय 7) हा शनिवारी रात्री 11 वाजता पावसात खेळत होता. त्यावेळी त्याची आई कांचन ही व आजी अंगणातील ओट्यावर बसून गंमत पाहत होते. खेळता खेळता दर्पणचा इलेक्ट्रिक खांबाला स्पर्श झाला. या खांबमध्ये वीज प्रवाह उतरल्यामुळे त्याला जोरदार शॉक लागला. हे त्याच्या आईने पाहिल्यानंतर तिने धाव घेत त्याला रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्याची तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. विजेच्या धक्क्यामुळे दर्पणचे शरीर निळे-काळे पडले होते. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर क्रॉम्प्टनचे काही कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्या ठिकाणच्या इलेक्ट्रिक खांबामधील विद्युत प्रवाह तपासला असता. तेथे असलेल्या टेलिफोनच्या खांबासह इतर दोघा इलेक्ट्रिक खांबामध्ये तीव्र विद्युत प्रवाह आढळून आला. दर्पण हा आर.आर. विद्यालयात शिकायला होता. यंदा त्याने पहिलीच्या वर्गात प्रथम क्रमांक पटकावला होता.