आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon Football Player Give Foreign Players Lesson

जळगावच्या फुटबॉलपटूकडून विदेशी खेळाडूंना धडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पुस्तकांत मन रमत नसले तर कोणता तरी छंद वा खेळात विद्यार्थी नक्कीच गुंततो. तसेच त्याला त्याच वाटेने प्रवास करू दिल्यास यशही मिळते. अशाच पद्धतीने जळगावातील एका फुटबॉलपटूने मैदानावर आपले कौशल्य दाखवत थेट परदेशातील खेळाडूंना प्रशिक्षण देण्यापर्यंत मजल मारली आहे. उदय हरीश फालक असे या तरुणाचे नाव आहे. येथील ब.गो.शानभाग विद्यालयात दहावीपर्यंत शिक्षण घेऊन त्याने पुणे, मुंबई, स्विडन, डेन्मार्क येथे स्वत:सह कुटुंब जळगाव शहराचा नावलौकिक वाढवला आहे.

शानभाग विद्यालयात शिक्षण घेत असताना उदय अभ्यासात जेमतेम आणि खोडकरही हाेता. मात्र, फुटबॉल, क्रिकेट, खो-खो यासारख्या मैदानी खेळांवर त्याची चांगली पकड होती. शाळेत असतानाच त्याने फुटबॉलमध्ये मैदानी कौशल्य दाखवत शिक्षकांसह दिग्गज फुटबॉलपटूंचे लक्ष केंद्रित करून घेतले. पाहता-पाहता त्याने करिअर म्हणून फुटबॉलची निवड केली. दहावी-बारावी उत्तीर्ण होईपर्यंत शालेय विभागीय स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये त्याने बक्षिसे मिळवली. तसेच दरम्यानच्या काळात खेळाचे उत्तम प्रदर्शन केल्यामुळे व्यावसायिक स्पर्धांमध्येही त्याला चांगली मागणी झाली. आठ वर्षांचा प्रवास पूर्ण करून सध्या तो मुंबईतील पलावा या भागात असलेल्या अार्सेनल सॉकर स्कूलमध्ये सहायक प्रशिक्षक पदावर कार्यरत आहे. अार्सेनल हा मूळ इंग्लंडचा क्लब आहे. भारतातील फुटबॉल खेळाडूंना चालना मिळावी म्हणून अार्सेनलने मुंबईत प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे.

फुटबालपटू उदय फालक आता लक्ष ‘यूईएफए’वर
फुटबॉलसाठी प्रसिद्ध असलेल्या स्पेन, युरोप यासारख्या देशांमध्ये भारतीय खेळाडूंचे वर्चस्व असावे यासाठी उदय आता ‘यूईएफए’ या युरोपच्या फुटबॉल संघटनेशी जोडला जाणार आहे. तेथील परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर जगभरातील कोणत्याही देशात फुटबॉल प्रशिक्षक म्हणून त्याची ओळख निर्माण होईल. सध्या तसे प्रयत्न सुरू असल्याची माहिती उदयने ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

पुण्यात मिळवले इंटरनॅशनल कोचिंगचे लायसन्स
आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले नाव कोरले जावे, हे ध्येय ठेवून उदयने त्या दिशेने पुण्यातून प्रवास सुरू केला. त्यासाठी पुण्यातील लिव्हरपूल युनिव्हर्सिटीने आयोजित केलेल्या ‘फुटबॉल लेव्हल वन’ या कोचिंग लायसन्ससाठी परीक्षा दिली. या परीक्षेत केवळ पाच जण उत्तीर्ण झाले. त्यापैकी एक उदय होता. त्यानंतर मुंबईतील प्रीमियर इंडिया फुटबॉल अकॅडमी पुण्यातील यूथ क्लब सॉकर अकॅडमी या दोन दिग्गज संस्थांमध्ये त्याने नवोदित फुटबॉल खेळाडूंना खेळण्याचे तंत्र शिकवले आहे.

खेळाडूसहव्यवस्थापकाची भूमिका बजावली
उदयने२००८मध्ये पुण्यातील सिंहगड महाविद्यालयात बीबीएला प्रवेश घेतला. त्याच वर्षी कन्याकुमारी येथे झालेल्या स्पर्धेत त्याने महाराष्ट्राच्या संघात उपकप्तान म्हणून भूमिका बजावली. फुटबॉल खेळण्याचे त्याचे तंत्र पाहून अनेक प्रशिक्षकांनी त्याला हेरले. अवघ्या तीन वर्षांत म्हणजेच २०११मध्ये त्याने भारतीय संघात प्रवेश मिळवला. स्विडन येथे झालेल्या स्पर्धेत एकाच वेळी खेळाडू व्यवस्थापक अशा दोन्ही भूमिका यशस्वीपणे बजावल्या. स्विडन येथीलही काही खेळाडूंना त्याने धडे दिले.