आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावातील फुले मार्केट गाळेधारकांची याचिका न्यायालयाने केली रद्द

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- करार संपल्यामुळे गाळे खाली करून देण्याचा महापालिकेचा आदेश खोटा असल्याची गाळेधारकांची याचिका सोमवारी न्यायालयाने रद्दबातल ठरवली. या आदेशामुळे आता फुले मार्केटचे 339 गाळे महापालिका ताब्यात घेणार आहे.
शहरातील फुले आणि सेंट्रल फुले मार्केटमधील 339 गाळ्यांचा भाडेतत्त्वाचा करार 2009 मध्ये संपला होता. 20 वर्षांसाठी गाळेधारकांनी गाळे उपलब्ध करून दिल्याचा हा करार होता. त्यामुळे तत्कालीन प्रभारी आयुक्त सोमनाथ गुंजाळ यांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 81 ब प्रमाणे गाळेधारकांना गाळे खाली करण्याचे आदेश दिले होते. पालिकेने दिलेला आदेश खोटा असल्याचे ठरवत गाळेधारकांनी ऑगस्ट 2012 मध्ये न्यायालयात दिवाणी याचिका दाखल केली. त्यावर वेळोवेळी झालेल्या सुनावणीनंतर सोमवारी न्यायालयाने गाळेधारकांची याचिका रद्दबातल ठरवली. त्यामुळे आता पालिका हे गाळे ताब्यात घेईल. न्यायालयीन कामकाजात गाळेधारकांतर्फे अँड.दिलीप परांजपे, आयुक्तातर्फे अँड.केतन ढाके, तर महापौरांतर्फे अँड.टी.आर.पाटील यांनी काम पाहिले.
वेळोवळी मुदतवाढ मिळाली होती
2009 मध्ये भाडेतत्त्वाचा करार संपल्यानंतर गाळे खाली करून घेण्याच्या वेळी गाळेधारकांनी मुदतवाढ मागितली होती. 31 मार्च 2012 रोजी पालिकेने दिलेली अखेरची मुदत संपली होती. त्यानंतर पालिकेने कठोर पावले उचलत गाळे ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या. त्याचवेळी गाळेधारकांनी न्यायालयात धाव घेत जप्ती टाळली होती.
पालिकेचा आर्थिक फायदा होणार
न्यायालयात दिवाणी खटला सुरू झाल्यानंतर 1 एप्रिल 2012 पासून मनपाने गाळेधारकांकडून मालमत्ता कर स्वीकारले नव्हते. दरम्यानच्या काळात काही गाळेधारकांनी भाड्यापोटी धनादेश देण्याचा प्रयत्न केला. पालिकेने तेही नाकारले होते. आता नव्याने लिलाव झाल्यास पालिकेला आर्थिक फायदा होईल. आत्तापर्यंत चार कोटींचे नुकसान झाले आहे.
- अँड.केतन ढाके
इतर मार्केटचे भवितव्य लवकरच ठरणार
महापालिकेने एकाच वेळी फुले, सेंट्रल फुले, भिकमचंद जैन, चौबे, आंबेडकर आणि भोईटे या मार्केटमधील गाळ्यांनाही मुदत संपल्याच्या नोटीस दिल्या होत्या. फुले मार्केटप्रमाणे सर्वच मार्केटच्या गाळेधारकांनी याचिका दाखल केली होती. सर्व मार्केट मिळून एकूण 679 गाळे पालिका ताब्यात घेणार होती. येत्या आठवडाभरात या सर्वच मार्केटचे निर्णय होणार आहेत. या याचिकांवर निर्णय देण्यासाठी न्यायालयाने 4 जानेवारीपर्यंतच्या तारखा दिल्या आहेत.
पुढे काय?
न्यायालयाच्या आदेशानुसार मनपाने गाळेधारकांना गाळे खाली करण्याचे आदेश ग्राह्य धरले आहेत. त्यामुळे आता पालिका कोणत्याही क्षणी गाळे ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करू शकते. गाळे पुन्हा भाडेतत्त्वावर मिळवण्यासाठी लिलाव होईल. सध्या गाळ्यात सामान असलेल्या दुकानदार लिलावात भाग घेऊ शकतात. पालिकेतर्फे त्यांना प्राधान्य देण्यात येईल अथवा गाळेधारक उच्च् न्यायालयातही दाद मागू शकतात.
काय आहे 81 ब
संबंधितांकडून भाडे किंवा कर दोन महिन्यांपेक्षा अधिक मुदतीत दिलेले नसेल, भोगवटा करण्यासाठी दिलेल्या अटींचे उल्लंघन करण्यात आलेले असेल आणि अशा जागा पालिकेस सार्वजनिक हिताच्या दृष्टीने आवश्यक असल्याची आयुक्तांची खात्री झाल्यास संबधितांना पालिकेच्या जागेतून काढून टाकण्याचा आदेश आयुक्त देऊ शकतात.