आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव - कनिष्ठ अभियंत्यानेच शिवाजी उद्यानात वृक्षतोड केल्याचा प्रकार ‘दिव्य मराठी’ने छायाचित्रांसह उघड केल्यानंतर महापालिकेचे अधिकारी खडबडून जागे झाले आहेत. याप्रकरणी सोमवारी महापालिकेच्या पर्यावरण अधिकार्यांनी उद्यानात जाऊन पाहणी केली. यात इतर वृक्षांचीही कत्तल केल्याचे या वेळी स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी रीतसर प्रक्रिया पूर्ण करून कनिष्ठ अभियंत्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पर्यावरण अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे.
मेहरूण तलावाकाठच्या शिवाजी उद्यानाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने वृक्षांची विनापरवाना कत्तल सुरू आहे. उद्यानाच्या रक्षणाची जबाबदारी असलेले महापालिकेचे कनिष्ठ अभियंता विजय मराठे यांनी गुरुवारी कर्मचार्यांच्या मदतीने वृक्षतोड केल्याची बाब ‘दिव्य मराठी’ने 25 जानेवारी रोजी उघडकीस आणली होती. वृक्षतोडीचा भंडाफोड होताच उधळी लागल्याची बतावणी संबंधितांकडून करण्यात आली. तसेच डांबर वितळण्यासाठी या लाकडांचा वापर होणार असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी चार दिवस उलटूनही दोषींवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. शासकीय सुट्या व प्रशिक्षणामुळे बाहेरगावी गेलेल्या पर्यावरण अधिकार्यांनी सोमवारी घटनास्थळी पाहणी केली. या वेळी त्यांना इतरही वृक्ष तोडल्याचे निदर्शनास आले. शहरातील अन्य ठिकाणी सामान्य नागरिकांकडून विनापरवानगी वृक्षतोड केल्याची बाब निदर्शनास आलेल्या प्रकरणांमध्ये तत्काळ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बेकायदा वृक्षतोडीसंदर्भात न्यायालयात खटलेही सुरू आहेत. असे असताना मेहरूण तलावाकाठच्या शिवाजी उद्यानातील वृक्षतोडप्रकरणी गुन्हे दाखल करण्यास चालढकल केली जात आहे. चार दिवस उलटूनही संबंधितांवर ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
वृक्षांवर नंबर टाकण्याची गरज
उद्यानातील मोठय़ा झाडांची गणना यापूर्वी झालेली नाही. पर्यावरण अहवालातही या संदर्भात दिशाभूल करणारी माहिती आहे. दरवर्षी उद्यानात 1200 वृक्षारोपण करण्यात येते, तरी वृक्षांची संख्या केवळ 500 आहे. मोठय़ा वृक्षांची गणना करून प्रत्येक वृक्षाला क्रमांक देणे गरजेचे आहे. वृक्षांना क्रमांक दिल्यास कोणत्या वृक्षाची तोड झाली हे स्पष्ट होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.