आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अधिकार्‍यांना डावलून घरकुल ठराव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी पोलिसांना दोन जबाब दिले आहेत. दोन्हीही जबाब त्यांनी तपासाधिकारी इशू सिंधू यांना समक्ष लिहून दिले आहेत. त्यातील 26 नोव्हेंबर 2011 रोजीच्या जबाबात प्रदीप रायसोनी यांच्या कार्यपद्धतीला लक्ष्य केले गेले आहे. देवकर यांचा हा जबाब त्यांच्याच शब्दात असा - जळगाव शहरात कमी उत्पन्न गटासाठी घरकुले बांधण्याबाबतचे धोरण नगराध्यक्षा पुष्पा पाटील यांच्या कार्यकाळात ठरविण्यात आले होते. मी वरील कालावधीत नगराध्यक्ष होतो.
सर्वसाधारण सभेत चंद्रकांत कापसे यांची मूळ सूचना - 8/10/91 रोजी नगरपालिका सर्वसाधारण सभेदरम्यान सदस्य चंद्रकांत कापसे यांनी पिंप्राळा गट नं. 219चे घरकुल बांधणेबाबतची सूचना मांडली. त्यावर तांबापुरा येथील झोपडीवासीयांकरिता पिंप्राळा गट नं.214 (पार्ट), 218, 221/1, 221/2, /2 पार्ट येथे 1,616 घरकुले बांधणे, फुकटपुरा येथील झोपडीवासीयांकरिता पिंप्राळा गट नं.223/3मध्ये 380 घरकुले बांधणे व समतानगर येथील झोपडपट्टीवासीयांकरिता पिंप्राळा गट नं. 221/2/2 (पार्ट), 220 (पार्ट), 252/1, 221/1, 223/3(पार्ट)मध्ये 2,300 घरकुले बांधण्याबाबत ठराव मांडला. त्यास सभेने मंजुरी दिली. हरिविठ्ठल व खंडेरावनगर, आसोदा रोडवरील झोपडपट्टीवासीयांकरिता नगरपालिका ठराव क्रमांक 54, दि. 24/4/99अन्वये पिंप्राळा गट नं.21 लगत नवीन जमीन खरेदी केलेल्या जागेवर खंडेरावनगर व आसोदा रोड येथील झोपडपट्टीवासीयांकरिता घरकुले बांधण्यास सभेने मंजुरी दिली.
काबरे-चौधरी यांच्या नेमणुकीसाठी सुधारित करारनामा - घरकुल कामासाठी वास्तुशास्त्रज्ञ म्हणून काबरे-चौधरी यांना नेमण्यास व सुधारित करारनामा करून घेऊन मेहनताना देण्यास न.पा. सभेने मंजुरी दिली. सर्व कामांची निविदा खान्देश बिल्डर्स यांना अंदाजित रकमेवर 17.50 दराने काम करून घेण्यासाठी सभेने मंजुरी दिली. याबाबत पालिकेत ठराव 321 मंजूर करण्यात आला आहे. ठराव मंजूर करताना नगरपालिकेचे संबंधित अधिकारी व मुख्याधिकारी यांना सदर ठराव मंजूर केल्यास उद्भवणार्‍या कुठल्याही तांत्रिक किंवा कायदेशीर बाबींबाबत विचारणा करण्यात आली नाही किंवा त्यांचे मत विचारात न घेता सदर ठराव बहुमताचे जोरावर मंजूर करण्यात आला.
नगराध्यक्ष असताना घरकुलच्या ठरावांच्या बाजूने मतदान - दिनांक 16/11/1999 रोजी ठेकेदार खान्देश बिल्डर्स यांना समतानगर हाऊसिंग स्कीमचे काम सुरू केलेबाबत व त्या कामापोटी 20 लाख रुपये अँडव्हान्स देण्याची विनंती केली होती. त्यावर तत्कालीन सहा.अभियंता यांना आपले टिप्पणीमध्ये 15 लक्ष अँडव्हान्स देण्यास हरकत नसल्याचे म्हटले आहे. तसेच आंतरलेखापरीक्षक यांनी आपला शेरा लिहिला आहे की, निविदा शर्त क्लॉज 14मध्ये नमूद केल्याप्रमाणे साइटवर जमा करण्यात आलेल्या साहित्याच्या किमतीचे 75 टक्केप्रमाणे अँडव्हान्स दिले जाऊ शकते. त्यावर मुख्याधिकारी यांनी रिपोर्टप्रमाणे हरकत नाही, असा शेरा लिहिला आहे. त्यावरून मी अँडव्हान्स द्यावा, असा आदेश नगराध्यक्ष म्हणून माझे अधिकारात दिला आहे. त्याबाबतचा ठराव क्रमांक 365 दिनांक 26/11/1999 रोजी नगरपालिकेचे सर्वसाधारण सभेत बहुमताने मंजूर करण्यात आला आहे. तसेच मी नगराध्यक्ष होण्यापूर्वी व नंतर नगरपालिकेत सन 1996 ते 2001 या कालावधीत नगराध्यक्ष असतानाचे काळात नगरपालिका सभेत घरकुल बांधकामाबाबत मंजूर झालेले सर्व ठरावांचे बाजूने मतदान केले आहे.
प्रदीप रायसोनी यांच्या सांगण्यावरून टिप्पणीवर सहया
- घरकुल राबविण्याच्या कालावधीमध्ये समिती सभापती प्रदीप रायसोनी हे होते. त्यांचे सांगणेप्रमाणे मी अधिकार्‍यांनी पाठविलेले टिप्पणीवर सही करत होतो. मला त्या वेळी नगरपालिकेच्या कामकाजाबाबत माहिती नव्हती. सदर समितीचे मीटिंगसाठी नगराध्यक्ष म्हणून मी हजर राहत नव्हतो. त्यामुळे त्या मीटिंगमध्ये काय चर्चा होत होती, याबाबत मला काहीही सांगता येणार नाही. सदर उच्चाधिकार समितीचे सभापती प्रदीप रायसोनी हे नगरपालिकेतील कामकाजाबाबत एकटेच निर्णय घेत होते. नगरपालिका सर्वसाधारण सभेपूर्वी पार्टी मीटिंग सुरेश जैन यांचे बंगल्यावर होत असे.
काय-काय म्हटलेय, देवकर यांनी जबाबात
> प्रदीप रायसोनी सुरेश जैन यांच्या बंगल्यावरील पार्टी मीटिंगमध्ये मार्गदर्शन करीत असत. नगरपालिकेच्या कामकाजाबाबत निर्णय घेऊन त्याबाबत नगरसेवकांना ते माहिती देत होते.
> पार्टी मीटिंगमध्ये प्रदीप रायसोनी यांनी मार्गदर्शन केल्यानंतर नगरपालिका सर्वसाधारण सभेमध्ये कुठल्याही विषयावर चर्चा होत नव्हती.
> नगरपालिकेचे कर्मचारी हे ठराव क्र.1 ते .. पर्यंत असे त्यातील तपशील न वाचता उच्चारत असे व हजर नगरसेवक हे मंजूर.. मंजूर.. मंजूर.. असे मोठय़ाने म्हणत असत.
> त्या काळात नगरपालिका सर्वसाधारण सभा ही पंधरा ते वीस मिनिटांत संपत असे.
> मी नगराध्यक्ष होण्यापूर्वी व नंतर नगरपालिकेत सन 1996 ते 2001 या कालावधीत नगराध्यक्ष असतानाचे काळात नगरपालिका सभेत घरकुल बांधकामाबाबत मंजूर झालेले सर्व ठरावांचे बाजूने मतदान केले आहे.
> अधिकारयांनी अनुकूल शेरा दिल्याने मी खान्देश बिल्डर्सला अँडव्हान्स द्यावा, असा आदेश नगराध्यक्ष म्हणून माझे अधिकारात दिला आहे. त्याबाबतचा ठराव क्रमांक 365 दिनांक 26/11/1999 रोजी नगरपालिकेचे सर्वसाधारण सभेत बहुमताने मंजूर करण्यात आला आहे.
> घरकुलबाबत सुरेश जैन यांनी पार्टी मीटिंगमध्ये सर्वांना स्लम-फ्री सिटी बनविण्याचे स्वप्न दाखविले. त्यासाठी सुरेश जैन यांनी हुडकोकडून कर्ज मंजूर घेण्याची व त्यासाठी शासन हमी मिळवून देण्याची हमी पार्टी मीटिंगमध्ये सर्वांना दिली होती.
जैन यांच्या बंगल्यावर कामकाज - शहर विकास आघाडीची पार्टी मीटिंग सुरेश जैन यांचे बंगल्यावर 7, शिवाजीनगर येथे होत होती. तेथे सर्व नगरसेवकांना सर्वसाधारण सभेत ठरावांचे बाजूने मतदान करण्याबाबत सांगण्यात येत होते. सुरेश जैन यांचे वतीने प्रदीन रायसोनी हे आदेश देत होते. महत्त्वाचा विषय असेल तर सुरेश जैन स्वत: पार्टी मीटिंगला हजर राहून आदेश देत होते. पार्टी मीटिंगमध्ये कोणत्याही विषयावर चर्चा होत नव्हती. ज्या विषयावर चर्चा होणे अपेक्षित होते, त्या विषयावर पार्टी मीटिंगमध्ये चर्चा होत नव्हती.
विरोध केल्यास मोठा फटका - सुरेश जैन हे ‘शविआ’चे मुख्य प्रवर्तक असल्याने व त्यांचा पार्टीवर असलेला दबदबा, धाक यामुळे त्यांच्याविरुद्ध कोणीही बोलण्यास तयार होत नव्हते. जो नगरसेवक विरोध करील त्या प्रभागात पालिकेतर्फे चालू असलेली विकासकामे थांबविली जात. तसेच त्यास पालिकेचे कोणतेही काम देण्यात येत नव्हते. त्यामुळे त्यांना विरोध करण्याची कोणीही हिंमत करीत नसे. नगरसेवक व नगराध्यक्षांच्या कोर्‍या कागदांवर सह्या घेतल्या जात. तसेच नगरपालिकेच्या चेकबुकवरील कोर्‍या चेकवर सह्या घेतल्या जात होत्या.
मी उच्चाधिकार समितीचा सदस्य असल्याबाबत मला माहिती नाही. तसेच उच्चाधिकार समिती गठीत करण्यात आल्याबाबतही मला माहिती नाही. सदर उच्चाधिकार समितीचा ठराव कधी पारित झाला, याबाबत मला काहीही माहीत नाही. शहर विकास आघाडीचे कार्यकाळात कोणत्याही ठरावावर चर्चा होत नव्हती. सुरेश जैन यांचे सांगण्याप्रमाणे प्रदीप रायसोनी हे नगरपालिकेचे काम पाहत होते व आदेश देत होते. ते नगरपालिकेचे सर्वेसर्वा होते. त्यामुळे त्यांना विरोध करता येत नव्हता. उच्चाधिकार समितीने कोणत्याही विषयावर काम केलेले नाही. नगरपालिकेचे कामकाजाबाबत सर्व निर्णय हे सुरेश जैन यांचे बंगल्यावर प्रदीप रायसोनी व सुरेश जैन हे मिळून घेत होते.
नगरसेवकाएवढाच जबाबदार - घरकुल योजना राबविण्याबाबत कुठलाही ठराव पारित करण्यात आला नाही. रायसोनी यांनी थेट आदेश देण्यास सुरुवात केली. पालिका सभेत बहुमताने ठराव पारित झाल्यानंतर तो बेकायदेशीर असला तरी, निर्णय सर्वसाधारण सभेने घेतला असल्याने अध्यक्षास सही करणे भाग आहे. त्यामुळे कोणत्याही ठरावाबाबत नगरसेवक जबाबदारीएवढीच नगराध्यक्षाची जबाबदारी आहे. मी नगराध्यक्ष असतानाचे कार्यकाळात घरकुलबाबत सर्व निर्णय सभेने घेतले आहेत.
माझी बनावट सही केली गेली - 16/11/99 रोजीच्या खान्देश बिल्डर्स यांच्या अर्जावर सहायक अभियंता यांनी अँडव्हान्स देण्यास हरकत नाही, असा अभिप्राय दिला. आंतरलेखा परीक्षक व मुख्याधिकारयांनीही अभिप्राय दिला. अध्यक्ष म्हणून अँडव्हान्स द्यावा, असा आदेश व त्याखाली केलेली सही मात्र माझी नाही, हे मी सांगतो. ही सही कुणाची याबाबत काही सांगता येणार नाही. या टिप्पणीवर 26/11/99 रोजी ठराव 365, ठेकेदारास 15 लक्ष रुपये अग्रीम धन देण्याबाबत पारित करण्यात आला.