आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रायसोनी, शिरसाळेंचा जामीन फेटाळला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - घरकुल घोटाळ्यातील आरोपी तथा माजी महापौर प्रदीप रायसोनी यांनी जामिनासाठी औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेला जामीन अर्ज न्यायाधीश आंबादास जोशी यांनी फेटाळून लावला आहे. रायसोनी यांचा अर्ज खंडपीठात दुसर्‍यांदा फेटाळण्यात आला आहे. तसेच माजी नगरसेवक अरुण शिरसाळे यांनी देखील जामिनासाठी अर्ज केला होता. तो अर्ज देखील गुरुवारी न्यायाधीश व्ही.एस. दीक्षित यांनी फेटाळून लावत त्यांचा जामीन नामंजूर केला.

घरकुल घोटाळ्यातील प्रमुख सूत्रधार म्हणून रायसोनी यांना अटक झाल्यानंतर त्यांचा जामीन जिल्हा न्यायालयात तीन वेळा फेटाळला आहे. औरंगाबाद खंडपीठात त्यांनी जामिनासाठी केलेला अर्ज तब्बल दुसर्‍यांदा फेटाळून लावला आहे. रायसोनी यांनी खंडपीठात जामिनासाठी केलेल्या अर्जावर झालेल्या सुनावणी दरम्यान विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी आपल्या युक्तिवादात रायसोनी यांची घरकुलच्या गुन्ह्यातील भूमिका व रायसोनी यांनी घरकुल योजना पालिकेत राबविली त्या वेळी बजावलेली भूमिका कशी आहे, हे विषद करून सांगितले.

रायसोनी यांचे वकील पी.एम. शहा यांनी रायसोनी कसे दोषी नाहीत. घरकुलच्या माध्यमातून मिळालेला पैसा नेमका कोणाच्या खात्यात जमा झाला आहे, हे युक्तिवादातून सांगितले. त्रयस्त अर्जदार नरेंद्र पाटील यांचे वकील सतीश तळेकर यांनी देखील रायसोनी कशा प्रकारे दोषी आहेत व त्यांना का जामीन देण्यात येऊ नये याबाबत युक्तिवादातून न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. दोन्ही बाजूकडील युक्तिवाद ऐकून घेऊन न्यायाधीश जोशी यांनी या अर्जावर गुरुवारी निकाल देत रायसोनींचा अर्ज फेटाळून लावला आहे.
शिरसाळेंना पुन्हा जावे लागणार खंडपीठात - अरुण शिरसाळे यांचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर शिरसाळे यांनी जामिनासाठी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. मात्र, खंडपीठात न्यायाधीश पी.पी. नलावडे यांनी जामीन अर्जावरील कामकाज खालच्या कोर्टात चालवावे व आठ दिवसांच्या आत त्यांच्या जामीन अर्जावर निर्णय घ्यावा, असे आदेश दिले होते. त्यानंतर शिरसाळे यांच्या जामीन अर्जावर न्यायाधीश दीक्षित यांच्यासमोर सुनावणी झाली. यात त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावत न्यायालयाने जामीन नामंजूर केला आहे. त्यामुळे त्यांना जामीनासाठी आता खंडपीठात जाणे लागणार आहे. सुनावणीत विशेष सरकारी वकील अँड. प्रवीण चव्हाण यांनी बाजू मांडली
सुरेश जैन यांना कारागृहात हलविण्यावर 7ला सुनावणी - आमदार सुरेश जैन यांना कारागृहात हलवावे, अशी मागणी विशेष सरकारी वकील अँड.प्रवीण चव्हाण यांनी न्यायालयात एका अर्जाद्वारे केली होती. या अर्जावर गुरुवारी सुनावणी होणार होती; मात्र सुनावणीदरम्यान आमदार जैन यांचे वकील अँड.अकिल इस्माईल यांनी आपले म्हणणे सादर करण्यासाठी एका अर्जाद्वारे न्यायालयाकडे वेळ मागून घेतला. त्यांनी दाखल केलेल्या अर्जात आमदार जैन यांचे वैद्यकीय दाखले अद्याप प्राप्त झाले नसल्याचा खुलासा केला आहे. त्यामुळे न्यायालयाने आरोपींचे वकील अँड.अकिल इस्माईल यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी वेळ देत या अर्जावर 7 रोजी सुनावणी घेण्याचे जाहीर केले. ही सुनवणी न्यायाधीश व्ही.एस.दीक्षित यांच्यासमोर होईल.