आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकच चर्चा चोहीकडे, आप्पा गेले कुणीकडे?

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- संपर्ककक्षेपलीकडे जाईपर्यंत सुरळीत असलेला पालकमंत्री गुलाबराव देवकर यांचा पूर्वनियोजित कार्यक्रम न्यायालयाच्या निकालाची वार्ता येताच अचानक बदलला. बाहेरगावाहून आप्पांकडे भेटीसाठी आलेल्या मंडळीला नेमके कारणच कळत नव्हते. असा दिवसभर अनेकांचा खोळंबा झाला.
देवकर सोमवारी सकाळीच निबंध स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी फैजपूरकडे रवाना झाले होते. हा कार्यक्रम आटोपून ते 11.30 वाजेच्या सुमारास जळगावकडे निघाले. त्यानंतर ते दुपारी संचालक मंडळाच्या बैठकीसाठी जिल्हा बॅँकेत पोहोचले. मात्र, कोरमअभावी सभा तहकूब झाली. बॅँकेतच त्यांना खंडपीठाने जामीन रद्द केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर लगेच दुपारी 3.15 वाजेच्या सुमारास ते थेट शिरसोली रोडवरील अभियांत्रिकी महाविद्यालयात पोहचले. या वेळी त्यांच्यासोबत शासकीय लवाजमाही होता. सायंकाळी 4.15 च्या सुमारास त्यांनी ताफ्यातील आरटीओ विभागाच्या वाहनासह शासकीय वाहने परत पाठवली होती. आरटीओ वाहन 4.30 वाजता कार्यालयात परत येऊन पोहचले होते. दरम्यान, देवकर एका खासगी वाहनातून जळगावकडे रवाना झाले. ज्या वाहनाने देवकरांना जळगावात सोडले ते नंतर पुन्हा महाविद्यालयात येऊन पोहचले. मात्र, त्यानंतर देवकर नेमके त्यांच्या बंगल्यावर पोहोचले की अन्य कुठे गेले हे रहस्य सर्वांनाच बुचकळ्यात टाकणारे ठरले. सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास देवकरांच्या बंगल्यातून एक काळ्या रंगाची कपड्यांची बॅग नेताना दोन कार्यकर्ते दिसले. त्यामुळे देवकर मुंबईला तर रवाना झाले नाहीत ना? अशी विचारणा केली जात होती. देवकरांना भेटण्यासाठी आलेल्या ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनाही आता आप्पांना कुठे भेटायचे, अशी चिंता होती. देवकर आता राजीनामा देतील काय? त्यांचा जामीन पक्षर्शेष्ठी मंजूर करतील की नाही? असे अनेक प्रश्न कार्यकर्त्यांच्या घोळक्यात चर्चिले जात होते.
विश्रामगृहातील गर्दी काही मिनिटात ओसरली
जळगावी मुक्काम असला म्हणजे पालकमंत्री पद्मालय विश्रामगृहातच भेटतील याची माहिती असल्याने अनेक कार्यकर्ते सकाळपासूनच विश्रामगृहाच्या आवारात जमले होते. सायंकाळी चारच्या सुमारास देवकरांचा जामीन रद्द झाल्याने त्यांना अटक होईल, अशा ब्रेकिंग न्यूज वाहिन्यांवर झळकू लागताच अनेक कार्यकर्त्यांनी विश्रामगृहातून काढता पाय घेतला. तोपर्यंत शहरातही सर्वत्र ही चर्चा सुरू झाली.
देवकर कॉलेजमध्ये पसरला सन्नाटा
देवकरांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास शिरसोली रोडवरील देवकर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कुजबूज सुरू झाली होती. देवकर कॉलेजकडे गेल्याचे कळताच पत्रकारांच्या ताफ्याने कॉलेज गाठले; मात्र सर्वांना प्रवेशद्वारावरच अडवण्यात आले. त्यानंतर 5 वाजून 03 मिनिटांनी जिल्हा बॅँकेची एमएच-19/एक्स-0372 क्रमांकाची इनोव्हा गाडी कॉलेजमध्ये आली. त्यात जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष अँड.वसंतराव मोरे, जिल्हा बॅँकेचे संचालक अँड.रवींद्र पाटील, जिल्हा बॅँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख होते. दहा मिनिटांत हे सारे पुन्हा बाहेर आले. त्या वेळी त्यांच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीकडे फायलींचा गठ्ठा होता. पत्रकारांनी विचारणा केली असता ‘आम्ही कॉलेजमध्ये अँडमिशनसंदर्भात आलो होतो’ असे उत्तर त्यांनी दिले. या फायली घेऊन चारही जण शहराकडे निघून गेले. यादरम्यान कॉलेजमधील सुरक्षारक्षक पत्रकार व वृत्तपत्र छायाचित्रकारांवर नजर ठेवून होते व कोणालाही परिसरात फिरू देत नव्हते. परिसरातील अनेक विद्यार्थ्यांनाही आवाराबाहेर काढण्यात आले होते.
पालकमंत्र्यांविनाच आली 7171 गाडी
पालकमंत्री प्रवास करीत असलेल्या लाल दिव्याचे वाहन क्रमांक एम.एच.19 एम 7171 हे वाहन सायंकाळी चारच्या सुमारास पद्मालय विश्रामगृहात येताच सर्व अलर्ट झाले होते. मात्र, त्यातून केवळ चालकच उतरल्याने पालकमंत्री देवकर कोणत्या वाहनातून येताहेत याबाबत चर्चा सुरू झाली. काही मिनिटातच लाल दिव्याची गाडी रिकामी परतली. त्यामुळे पालकमंत्री नसताना त्यांची लाल दिव्याची गाडी आलीच कशी? असा प्रश्न उभा राहिला.
राष्ट्रवादी भवनाबाहेरही झुंडी
न्यायालयाचा निकाल येताच दुपारी जिल्हा बॅँकेतून अचानक निघून गेलेले पालक मंत्री अखेर गेले कुठे? या उत्सुकतेपोटी जिल्हा राष्ट्रवादी कार्यालय व मजूर फेडरेशन समोर कार्यकर्त्यांच्या झुंडी थांबून होत्या. पक्ष कार्यालयात जिल्हाध्यक्ष गफ्फार मलिक, महानगराध्यक्ष विनोद देशमुख, मंगला पाटील, नीलेश पाटील, भुसावळचे नगराध्यक्ष उमेश नेमाडे आदी कार्यकर्त्यांसोबत थांबून होते. तर मजूर फेडरेशनचे कार्यालय बंद असले तरी इमारतीच्या आवारात कार्यकर्त्यांची गर्दी दिसत होती.
संचालकांच्या अनुपस्थितीमुळे जिल्हा बॅँकेची सभा अनपेक्षितरीत्या तहकूब
अनेक संचालक जिल्हा बॅँक परिसरात आलेले असतानाही सोमवारी दुपारी जिल्हा बॅँकेची सभा कोरमअभावी अनपेक्षितरित्या तहकूब करण्यात आली. पुरेशा संचालकांच्या अनुपस्थितीने ही सभा दुसर्‍यांदा तहकूब करण्यात आली आहे. कॉँग्रेसचे काही संचालक मुंबईला होते. त्यातच देवकर यांच्या जामिनासंदर्भात निकालाची बातमी येताच बॅँकेतील वातावरणाचा नूरच पालटला. तोपर्यंत बॅँकेत असलेले देवकर अचानक तिथून निघून गेले. त्याबरोबर अनेक संचालकांनीही काढता पाय घेतला. रेकॉर्डनुसार, बैठकीस माजी खासदार अँड.वसंत मोरे, विजय नवल पाटील, अनिल भाईदास पाटील, अँड.रवींद्र पाटील, डी.के. पाटील आदी आठ संचालक उपस्थित होते.