आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon Gharkul Scam Issue MLA Suresh Jain No Bail

घरकुल घोटाळा: सुरेश जैन यांचा ‘इतिहास’च ठरतोय जामिनासाठी अडथळा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- जळगावचे आमदार सुरेश जैन आणि अन्य दोघांचा जामिनासाठीचा अर्ज पुन्हा फेटाळला गेला आणि तो फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळताना दिलेल्या कारणांचाच विचार न्यायालयाने केला. त्यामुळे आरोपींना, विशेषत: सुरेश जैन यांना त्यांची कृतीच जामिनासाठी आडकाठी बनल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

आमदार जैन यांच्या विरोधात आरोपनिश्चिती झाल्यामुळे परिस्थितीत बदल झाला आहे, असा दावा त्यांचे वकील करीत असले तरी ‘इतिहास’ बदलत नाही, हेच या निकालाने अधोरेखित झाले आहे. आमदार जैन यांचा इतिहास आणि त्यांच्या सर्मथकांची वर्तणूकच त्यांना जामीन मिळण्यातील मोठी अडचण बनली आहे. त्यामुळे प्रारंभी अन्याय होत असल्याचे वाटत असले तरी न्यायालयीन प्रक्रियेला सहकार्य करण्यातच कसे हित असते, हेही सुरेश जैन आणि त्यांच्या सहआरोपींच्या या जामीन प्रकरणाने वारंवार समोर येत आहे.

आमदार सुरेश जैन यांच्यामुळे जळगावचा विकास कसा अडला आहे आणि ते कसे लोकनेते आहेत हे दाखविण्याचा कितीही प्रयत्न झाला तरी न्यायालयाला त्यांची ‘दादागिरी’च अधिक दखल घेण्यासारखी वाटत राहिली आहे, हेही न्यायालयांच्या आधीच्या निकालपत्रातील नोंदींवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच जैन यांच्यापेक्षा अधिक रकमेच्या अपहाराचा गुन्हा असतानाही अन्य राजकीय नेत्यांना न्यायालयाने जामीन दिला आणि जैन यांचा जामीन मात्र वारंवार नाकारला गेला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने आणि उच्च न्यायालयानेही जामीन फेटाळताना जिल्हा विशेष न्यायालयाने नोंदविलेल्या निरीक्षणांना महत्त्व दिल्याचे आधीच स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विशेष न्यायालयाने नोंदविलेल्या निरीक्षणांना महत्त्व आहे.

जामिनासाठी अडथळा ठरू शकणारी आठ महत्त्वाची कारणे
कारण क्र.1-
दिनांक 11 मार्च 2012 रोजीच्या स्टेशन डायरीत तपासाधिकारी इशू सिंधू यांनी नोंद केली आहे की, ‘ज्यावेळी आदरणीय न्यायाधीश चेंबरमध्ये गेले त्यावेळी सुरेश जैन यांनी त्यांना धमकी दिली की, ‘सिंधू कही न कही तो तुझे अटकाऊंगा. कही ना कही तो तू सपडेगा’.

कारण क्र.2-
ज्यावेळी जैन यांना पहिल्यांदा न्यायालयात आणले गेले त्यावेळी त्यांनी तपासाधिकार्‍यावर भर न्यायालयात आरोप केला की, त्याने 1 कोटी रुपयांची मागणी केली. त्यावर न्यायालयाने म्हटले आहे की, माझ्या मते तपासाधिकार्‍यावर त्याने माघार घ्यावी म्हणून दबाव निर्माण करण्याचाच उद्देश त्यामागे होता.

कारण क्र.3-
जिल्हा पोलिस अधीक्षकांनी 18 मार्च 2012 ला सीआयडीला एक पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी तपासाधिकार्‍याने त्यांना लिहिलेल्या पत्राचा उल्लेख केला आहे. त्या पत्रात सिंधू यांनी म्हटले आहे की, दिनांक 17 मार्च 2012 ला ते ज्यावेळी अमळनेर पोलिस ठाण्यात गेले त्यावेळी तिथे पोलिस कोठडीत असलेल्या सुरेश जैन यांनी त्यांना धमकी दिली की, ‘बाहर निकलने के बाद मेरा एकही काम है तुम्हे बरबाद करना।’ यावर न्यायालयाने म्हटले आहे की, अटक झाल्यापासून जैन हे तपासाधिकार्‍याला धमकी देत आहेत. त्यावरून मला असे वाटते की, अतिरिक्त पोलिस अधीक्षक पदावर असलेल्या अधिकार्‍याला आरोपी धमकी देऊ शकतो तर इतर साक्षीदारांना धमकावणे त्याला अजिबात कठीण नाही.

कारण क्र.4-
सुरेश जैन यांचे सर्मथकही सरकारी अधिकार्‍यांवर दडपण आणण्याचा प्रयत्न करतात, याचीही नोंद न्यायालयाने गंभीरपणे घेतली आहे. त्यासाठी जैन यांना वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात आणले असता जिल्हा शल्य चिकित्सकांवर हल्ला करण्यात आला, याचा उल्लेखही न्यायालयाने त्यावेळी केला आहे.

कारण क्र.5-
तत्कालीन महापौर सदाशिव ढेकळे यांनी 9 फेब्रुवारी 2011 रोजी जेलरला पत्र दिले होते. त्या पत्राचा उल्लेखही न्यायालयाने केला आहे. त्या पत्राद्वारे ढेकळे यांनी (ज्यांच्यावर पोलिस ठाण्यात शस्त्र कायद्यासह अनेक गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल असल्याचा विशेष उल्लेख न्यायालयाने केला आहे) जेलरवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. हा देखील सरकारी अधिकार्‍यांवर दबाव आणण्याचाच प्रयत्न असल्याची नोंद न्यायालयाने केली आहे.

कारण क्र.6-
तत्कालीन जेलर डॉ. भाईदास ढोले यांनी जेलच्या रजिस्टरमध्ये केलेली नोंदही अडचणीची ठरते आहे. त्यात त्यांनी 9 फेब्रुवारी 2011 चा प्रसंग दिला आहे. त्या दिवशी सुरेश जैन यांचे पी.ए. भावसार, सदाशिव ढेकळे आणि अशोक सपकाळे हे आमदार जैन यांचे पत्र घेऊन जेलरकडे गेले होते. त्या पत्राच्या आधारे ते रायसोनी, वाणी आणि मयूर यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी दबाव आणत होते, असे ढोले यांनी नमूद केले असून न्यायालयाने त्याचीही गांभीर्याने नोंद घेतली आहे.

कारण क्र.7-
या प्रकरणातील अत्यंत महत्त्वाच्या साक्षीदार सिंधू विजय कोल्हे यांनी कबुलीजबाब नोंदविल्यानंतर त्यांना धमकी देण्यात आली. त्याची नोंद घेताना न्यायालयाने म्हटले आहे की, पोलिस,सरकारी अधिकारी आणि साक्षीदार या सर्वांवरच दबाव आणण्याचे आणि त्यांना धमकावण्याचे प्रयत्न झाले आहेत.

कारण क्र.8-
अटकेनंतर रायसोनी, वाणी आणि मयूर यांना जिल्हा रुग्णालयात आणले असता आमदार सुरेश जैन यांनी त्यांची भेट घेतली. त्याचे छायाचित्रही प्रसिद्ध झाले. त्यावरून जैन हे राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न करतात असा निष्कर्ष न्यायालयाने काढला आहे.

(जळगाव जिल्हा विशेष न्यायालयाने 30 जुलै 2012 रोजी दिलेल्या निकालपत्रात नोंदविलेल्या आणि सर्वोच्च न्यायालयाने गांभीर्याने घेतलेल्या नोंदींवरून)