आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon Gharkul Scam Issue Suresh Jain Demand To Shift In Jalgaon Jail

घरकुल घोटाळा: सुरेश जैन म्हणतात, मला जळगाव कारागृहात हलवा!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहाच्या ताब्यात असलेले व मुंबईतच सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले घरकुल घोटाळ्यातील मुख्य आरोपी आमदार सुरेश जैन यांनी जळगाव जिल्हा न्यायालयाकडे त्यांना ‘सेंट जॉर्ज’मधून डिस्चार्ज मिळताच जळगाव कारागृहात हलविण्यात यावे, असा विनंती अर्ज दाखल केला आहे. जैन यांनी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एन.आर. क्षीरसागर यांच्या न्यायालयात वकिलांमार्फत हा अर्ज दाखल केला. राजकीय हेतूने प्रेरित आरोपांमुळे गेल्या दीड वर्षात मानसिक अवस्था अतिशय खालावल्याचेही जैन यांनी या अर्जात म्हटले आहे.
जैन यांना अटक झाल्यानंतर पोलिस कोठडीच्या कालावधीव्यतिरिक्त गेल्या दीड वर्षापासून ते दवाखान्यातच उपचार घेत आहेत. जैन हे जळगाव कारागृहाच्या ताब्यात असताना देखील त्यांच्यावर मुंबईच्या ब्रीच कॅन्डी व जसलोक हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना मुंबई येथे ऑर्थर रोड कारागृहात हलविण्यात आले होते. ऑर्थर रोड कारागृहात दाखल होताच त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना सेंट जॉर्ज हॉस्पिटलात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून आजतागायत ते सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्येच उपचार घेत आहेत.
जैन यांनी गुरुवारी अचानक अ‍ॅड. अकिल इस्माईल यांच्यामार्फत हा विनंती अर्ज जळगाव न्यायालयात दाखल केला. या अर्जावर 26 जुलै रोजी सरकारी वकिलांना खुलासा सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

ही आहे न्यायालयाकडे केलेली मागणी (प्रे)
0 न्यायालयाने मुंबईतील ऑर्थर रोड कारागृह प्रशासनाला म्हणजेच कारागृह अधीक्षकाला असे निर्देश द्यावेत की, सेंट जॉर्ज रुग्णालयातून डिस्चार्ज होताच मला जळगाव जिल्हा कारागृहात हलविण्यात यावे.
0 जळगाव कारागृह अधीक्षकाला असे आदेश द्यावेत की, मला त्यांच्या ताब्यात घेतल्यानंतर वकील, कुटुंबीयांना नियमांनुसार भेटण्यास परवानगी द्यावी. काही आणीबाणीची स्थिती उद्भवल्यास मला जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात यावे आणि गरज पडल्यास जळगावातील तज्ज्ञ डॉक्टर्सची सेवा घेऊ द्यावी.

सुरेश जैन यांनी वकिलामार्फत दाखल केलेल्या विनंती अर्जाचा आशय असा..

काय म्हणतो जैन यांचा विनंती अर्ज
1. सध्या मी मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहाच्या ताब्यात आहे व मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार घेत आहे. न्यायालयाने आरोप निश्चिती केल्यामुळे, आता खटल्याच्या सुनावणीत वेळोवेळी माझ्या उपस्थितीची गरज भासेल. जलद सुनावणीच्या दृष्टीनेही ते आवश्यक आहे.

2. माझी आरोग्याची स्थिती व वैद्यकीय इतिहास लक्षात घेतल्यास माझ्यासाठी मुंबई किंवा जळगाव हे दोनच ठिकाणे योग्य आहेत. या दोन्ही ठिकाणच्या डॉक्टरांनी माझ्यावर या पूर्वी उपचार केले आहेत. त्यामुळे त्यांना पुढील उपचाराची नेमकी कल्पना आहे. या शिवाय आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक सुविधा दोन्ही ठिकाणीच उपलब्ध आहेत.

3. जळगाव हे माझ्या हिताच्या दृष्टीने सर्वाधिक योग्य ठिकाण आहे. कारण सुनावणी जळगावात चालणार आहे. त्यामुळे योग्य ती वैद्यकीय दक्षता मला बाळगता येईल. तसेच बचावासाठी वकिलांशी चर्चा करणेही सोपे होईल. जळगावात राहिल्याने अनावश्यक प्रवासाचा त्रास वाचेल. शिवाय वैद्यकीय धोका, सुनावणीला विलंब होणार नाही.

4. खटल्याची जळगावात सुनावणी सुरू असताना मला त्यापासून लांब ठेवणे म्हणजे नैसर्गिक न्याय नाकारण्यासारखे आहे. माझा बचावाचा अधिकार अबाधित राहण्यासाठी मला वेळोवेळी वकिलांचे मार्गदर्शन, सल्ल्याची गरज भासणार आहे.

5. माझा वैद्यकीय इतिहास लक्षात घेतल्यास मुंबई ते जळगाव आणि परतीचा असा प्रवास दर तारखेला करण्यास मी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम नाही. जर तसे करणे भाग पडले तर माझ्या जीवितालाच धोका उत्पन्न होण्याची भीती आहे.

6. माझ्यावर यापूर्वीच जळगाव जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स तसेच जळगावातील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ व इतर तज्ज्ञांनी उपचार केले आहेत. त्यांना माझ्या प्रकृतीशी संबंधित बारीकसारीक बाबींची इत्थंभूत माहिती आहे. जेव्हा-केव्हा गरज पडेल तेव्हा या सर्वांची सेवा मला उपलब्ध व्हावी.

7. मानवतेच्या दृष्टिकोनातून सेंट जॉर्ज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होताच मला जळगाव कारागृहात हलविण्यात यावे. अशी विनंती मी करीत आहे. म्हणजे मला वकिलांशी सल्लामसलत करणे आणि खटल्याच्या सुनावणीत बचावासाठी तयारी करता येईल. याशिवाय जळगाव कारागृहात मानसिक व शारीरिक दृष्ट्याही मला सहजपणे समाधानी राहता येईल.

8. राजकीय हेतूने प्रेरित आरोपांमुळे गेल्या दीड वर्षात माझी मानसिक आणि मानसशास्त्रीय अवस्था अतिशय खालावली आहे. मला राजकारणातून व समाज जीवनातून उद्ध्वस्त करण्याच्या हेतूनेच हे राजकीय आरोप केले गेले. त्यामुळे मला अत्यंत धक्का बसला आहे. डॉक्टरांच्या मते, राजकीय आरोपांमुळे आलेला तणाव व बसलेला धक्का हेच माझ्या सध्याच्या वैद्यकीय अवस्थेचे मुख्य कारण आहे. माझे वय आणि मानसिक स्थिती लक्षात घेता मला जर काही झाले तर त्या स्थितीत माझे गाव, घर, परिसरातच जायला मला आवडेल. मी याच ठिकाणी वाढलो, संपूर्ण आयुष्य येथेच व्यतीत झाले. येथील विविध क्षेत्रात नेहमीच कार्यरत राहिलो आहे.