आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Jalgaon Gharkul Scam Mla Suresh Jain Demand To Interim Bail

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घरकुल घोटाळा: आमदार जैनांना पुन्हा वाढवून हवाय तात्पुरता जामीन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव: घरकुल घोटाळ्यातील आरोपी आमदार सुरेश जैन हे सध्या वैद्यकीय कारणासाठी तात्पुरत्या जामिनावर आहेत. पुन्हा सहा आठवड्यांसाठी तात्पुरता जामीन वाढवून हवा असल्याने त्यांनी वकिलांमार्फत न्यायालयात अर्ज सादर केला आहे. या अर्जावर शुक्रवारी तपासाधिकार्‍यांनी म्हणणे सादर करावे, असा आदेश न्यायाधीश व्ही. एस. दीक्षित यांनी दिला आहे.
अटक झाल्यानंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी होताच आमदार सुरेश जैन यांची प्रकृती बिघडली होती. त्यांच्या हृदयात 9 ठिकाणी अडथळे असल्याने मुंबई येथील ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलात बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यासाठी न्यायालयाने त्यांना 15 लाखांच्या जातमुचलक्यावर एक महिन्यासाठी जामीन दिला होता. ती मुदत संपल्याने जैन यांनी यापूर्वी एकदा जामिनाची मुदत न्यायालयाकडून वाढवून घेतली होती. त्या तात्पुरत्या जामिनाची मुदत 12 जून रोजी संपत असल्याने जैन यांना न्यायालयास शरण यावे लागणार होते. मात्र, न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे त्यांची वैद्यकीय तपासणी मुंबई येथील केईएम हॉस्पिटलच्या वैद्यकीय मंडळासमोर झाली असून त्याचा अहवालदेखील प्राप्त झाला आहे. त्यामुळे त्याच अहवालाचा आधार घेत जैन यांचे वकील अँड. सुशील अत्रे व अकिल ईस्माइल यांनी न्यायालयात जैन यांना तात्पुरता जामीन आणखी सहा आठवडे वाढवून मिळावा यासाठी अर्ज केला आहे. त्यांच्या अर्जावर न्यायालयाने 8 जून रोजी तपासाधिकार्‍यांना आपले म्हणणे सादर करण्याचा आदेश दिला आहे.
प्रदीप रायसोनी यांच्या अर्जावर आज सुनावणी
प्रदीप रायसोनींचा जामीन अर्ज खंडपीठाने फेटाळल्यानंतर त्यांनी पुन्हा जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या अर्जाबाबत सिंधू यांनी आपले म्हणणे लेखी स्वरूपात न्यायालयात सादर केल्यानंतर मंगळवारी सुनावणी घेण्यात येणार आहे. सिंधू हे सुटीवर असल्यामुळे अँड. प्रवीण चव्हाण हे बाजू मांडणार आहेत. रायसोनी यांच्या वतीने दिल्लीचे ज्येष्ठ विधिज्ञ शशांक मनोहर बाजू मांडण्याची शक्यता आहे.
सोनवणे, मयूर यांचा अर्ज
कैलास सोनवणे यांनी जामीन मिळण्यासाठी स्वतंत्ररित्या न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या अर्जावर सिंधूंनी 8 जून रोजी आपले म्हणणे सादर करावे, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. तसेच राजा मयूर यांनी वैद्यकीय चाचण्यांसाठी आपल्याला मुंबई येथील जसलोक रुग्णालयात हलविण्यात यावे असा अर्ज न्यायालयास दिला आहे. त्या अर्जावर तपासाधिकार्‍यांनी आपले म्हणणे सादर करावे, असे न्यायालयाने सांगितले असून तपासाधिकारी सिंधू आज आपले म्हणणे न्यायालयात लेखी स्वरूपात सादर करणार आहेत.
6 नगरसेवकांच्या जामिनावर 8 ला निर्णय
आजी-माजी नगरसेवक अजय जाधव, भगत बालाणी, वासुदेव सोनवणे, इकबाल पिरजादे, चत्रभूज सोनवणे, चंद्रकांत सोनवणेंनी जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या अर्जावर मंगळवारी युक्तिवाद घेण्यात आला. दोन्ही बाजूकडील युक्तिवाद पूर्ण झाला आहे. युक्तिवादात बचाव पक्षाचे वकील अँड. अनिकेत निकम यांनी बाजू मांडताना सांगितले की, यापूर्वी याच घोटाळ्यात काही जणांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पालकमंत्री देवकर यांनादेखील न्यायालयाने जामीन दिला आहे. त्यामुळे सध्या अटकेत असलेल्या या सहाही जणांना न्यायालयाने जामीन द्यावा, अशी भूमिका निकम यांनी मांडली. यावर अँड. चव्हाण यांनी युक्तिवादात सांगितले की, ज्या आदेशावर न्यायालयाने याच प्रकरणात इतर आरोपींची जामिनावर सुटका केलेली आहे. त्या आदेशाचा आरोपींच्या वकिलांनी आधार घेतला आहे. मात्र, तो आदेश या न्यायालयाला बंधनकारक राहणार नाही. न्यायालयीन कोठडीत असलेल्या या सर्व आरोपींवर या पूर्वीचे विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यातील बहुतांश नगरसेवक स्वत: व काहींचे नातेवाईक मनपात नगरसेवक आहेत. त्यामुळे ते जामिनावर सुटल्यानंतर या खटल्यातील साक्षीदारांवर दबाव आणू शकतात. त्यांना जामीन नाकारण्यात यावा, अशी विनंती केली. न्यायाधीश दीक्षित यांनी दोघींचे म्हणणे ऐकून घेत अर्जावर 8 जूनला निकाल देणार असल्याचे सांगितले.
घरकुल घोटाळा: सुरेश जैन यांचा वैद्यकीय अहवाल न्यायालयास प्राप्त