आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात सोने 30,800 रुपयांवर;सुवर्ण बाजारपेठ सीमोल्लंघनासाठी सज्ज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून सुवर्णबाजारात घसरण सुरू होती. गेल्या दीड महिन्यात ही घसरण थांबून आता स्थिरता आली आहे. दसरा आणि दिवाळीच्या मुहूर्तावर ग्राहकांचा प्रतिसाद चांगला मिळणार असल्याने थंड पडलेल्या सराफ बाजाराला सोन्याचे दिवस येण्याची शक्यता सराफ व्यापार्‍यांकडून व्यक्त होत आहे. सोमवारी सोन्याच्या किमतीमध्ये काही वाढ झाली असताना मंगळवारी पुन्हा वाढ होऊन जळगावमध्ये सोने 30800 रुपयांवर पोहोचले, तर चांदीचे दरही वधारले.

सोन्याच्या भावातील घसरण थांबल्यानंतर सराफा बाजार दसर्‍याच्या मुहूर्तावर ग्राहकांच्या प्रतिसादाची प्रतीक्षा करीत आहे. भावात आलेली तेजी आणि दसरा-दिवाळीचा मुहूर्त यामुळे भावातील तेजी कायम राहील, असा अंदाज देखील व्यापार्‍यांकडून व्यक्त केला जात आहे. अमेरिकेतील शट डाऊन, डॉलरच्या तुलनेत रुपया सावरत असल्याने सुवर्णबाजारात त्याचे नेमके परिणाम काय होणार? याबाबत व्यापार्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. दरम्यान, भारतीय बाजारपेठेत सोन्याचे भाव वधारल्याने आणि मुहूर्तावर ग्राहकांचा प्रतिसाद मिळत असल्याने बाजार सावरल्याची प्रतिक्रिया व्यापार्‍यांमधून व्यक्त होत आहे. जळगाव सराफा बाजारात मंगळवारी चांदीचे भाव 52500 एवढे होते.

ग्राहकांचे खरेदीचे नियोजन सुरू
साडेतीन मुहूर्तांपैकी दसरा एक असल्याने त्या दिवशी सोने खरेदीचा योग साधण्यासाठी खरेदीदारांचे नियोजन सुरू झाले आहे. ग्राहकांची उत्सुकता व मुहूर्ताचा वेध घेऊन अलंकार व्यावसायिकांनीही विविध प्रकारातील आभूषणांची उपलब्धी वाढविली आहे.