आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हुडको कर्ज सेटलमेंट : मालमत्ता जप्तीची नामुष्की टाळण्यासाठी हालचाली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - मालमत्ता जप्तीची वेळ येऊ न देता पालिकेला कर्जमुक्त करण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. मंगळवारी सकाळी 11.30 वाजता हुडकोच्या मुख्य सचिवांसह या प्रकरणातील प्रमुख अधिकार्‍यांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला पालिका आयुक्त संजय कापडणीस स्वत: उपस्थित राहणार आहेत.

झोपडपट्टी निर्मूलन करून घरकुल उभारणीसाठी जळगाव नगरपालिका असताना हुडको या वित्तीय संस्थेकडून कर्ज घेतले होते. वर्षभरापासून कर्जाचे हप्ते फेडले जात नाही. त्यामुळे हुडकोने डीआरटी (ऋणनिर्देश न्यायालय) कोर्टात धाव घेतली आहे. कर्जाला राज्य शासनाने हमी दिली असली तरी कर्ज देताना तारण देण्यात आलेले नाही. त्यामुळे 17 मजली प्रशासकीय इमारत आणि फुले मार्केटवर जप्ती कारवाईची नोटीस 28 फेब्रुवारी 2013 रोजी पालिकेला देण्यात आली आहे. मालमत्तांचे मूल्यांकन करण्यासाठी हुडको व डीआरटीचे अधिकारी ऑगस्टमध्ये जळगावात येऊन गेले होते. पालिका निवडणुकीनंतर या प्रकरणाची सुनावणी होण्याची विनंती पालिका प्रशासनाने केली होती. मात्र बर्‍याच दिवसांपासून डीआरटी कोर्टात लांबत असलेले प्रकरण अंतिम टप्प्यात आले असून पालिकेच्या अडचणीचा निकाल लागण्यापूर्वी आयुक्तांकडून मार्ग काढण्याच्या हालचाली सुरूआहेत.