आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळी उलटली तरी डाळ शिजेना, तुरीचे भाव वधारल्याने डाळ ‘जैसे थे’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- तुरीचे भाव वधारल्याने दिवाळी उलटली तरी डाळीचे भाव स्थिरावण्याची तूर्तास शक्यता दिसत नाही. त्यातच पावसाने दगा दिल्याने तुरीचे पीकही धोक्यात आले असून त्याचा परिणाम उत्पन्नावर होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तुरी बाजारात विक्रीसाठी आल्यानंतरही तूर डाळीच्या भावाबाबत फारसा दिलासा मिळण्याची शक्यता धूसर होत आहे. त्याचप्रमाणे उडीद मूग डाळींच्याही बाबतीत हीच परिस्थिती आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून तूर, मूग आणि उडीद डाळ सर्वसामान्यांच्या ताटातून गायब झाली आहे. तूर डाळीऐवजी सोयाबीनच्या डाळीचे वरण सर्वसामान्यांच्या ताटात आले आहे. तूर डाळीच्या भावामध्ये पाच ते दहा रुपयांपेक्षा जास्त चढ-उतार होताना दिसत नाही. घसरण झाली तरी तूर डाळ शंभरीच्या खाली आलेली नाही. गेल्या आठवड्यात तूर डाळीचे भाव १५० ते १६० रुपये प्रतिकिलो होते. सद्य:स्थितीत तूर डाळ १३० ते १६० रुपये प्रतिकिलो रुपये दराने विकली जात आहे. तुरीचे भाव सहा हजार ४०० रुपये प्रतिक्विंटल आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक शून्य आहे. तुरीचे उत्पन्न निघण्यासाठी एक ते दीड महिन्याचा अवधी शिल्लक आहे. त्यातच दुष्काळी परिस्थिती असल्याने तुरीची मोठ्या प्रमाणात आवक होण्याची शक्यता नाही.

उडीद, मूगडाळही वधारली
यंदा पावसाने खरीप हंगामात दडी मारल्याने उडीद मुगाच्या उत्पन्नाला मोठा फटका बसला. बाजारपेठेत या शेतमालाची आवक अत्यंत कमी झाली. त्यामुळे उडीद मुगाच्या डाळींचे भाव कडाडले आहेत. तुरीबरोबर मूग उडीद डाळही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उडीद डाळीला सरासरी ११ हजार तर मुगाला ६४०० ते ७४९५ रुपये भाव दिले जात आहे.