जळगाव - काळी माती, उष्ण तापमान व शेणखताचा वापर यामुळे जळगाव जिल्ह्यातील केळीची चव जगातील कोणत्याही केळीपेक्षा वेगळी आहे. त्यामुळेच देशात केळीच्या व्यापारात तिसऱ्या स्थानी असलेल्या महाराष्ट्रातील ६७ टक्के केळी केवळ जळगाव जिल्ह्यात पिकते आणि २४०० कोटी रुपयांचे उत्पन्न या भागातील शेतकऱ्यांना मिळवून देते. ही रक्कम बहुतांश शेतकरी सोन्यामध्ये गंुतवत असल्यामुळे देशभरात जळगावची ओळख केळीबरोबरच सुवर्णनगरी म्हणूनही झाली आहे.
तामिळनाडू व गुजरातपाठोपाठ महाराष्ट्रात केळीचे उत्पादन घेतले जाते. केळी हे मध्यम तापमानाच्या दमट हवामानाचे पीक म्हणून ओळखले जात असले तरी जळगाव जिल्ह्यात तापी नदीच्या काठी येणारी केळी कोरड्या हवामानात येते. इथले तापमानही ४० अंशापेक्षा जास्त असतं. तापी खोर्यातील काळी माती व शेणखताचा होणारा वापर यामुळे या केळीला इतर ठिकाणच्या केळींपेक्षा जास्त गोडवा आहे आणि तोच या केळींचे आकर्षण वाढवणारा आहे.
भाजी की फळ?
राज्य व केंद्रांच्या कृषी खात्याने केळीला फळाचा दर्जा दिला. मात्र वाणिज्य मंत्रालय हे फळ मानायला तयार नाही. एकाच झाडावर एकापेक्षा अधिक हंगाम घेता येत नसल्याने ती भाजी आहे, असे या मंत्रालयाचे म्हणणे आहे. परिणामी फळासाठी वाहतुकीच्या दरात असलेल्या सवलती केळीला मिळत नाहीत.