आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अायटीअाय पेपरफुटीचा तपास थंडावला, अन्य राज्यांमध्येही पाळेमुळे असण्याची शक्यता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - आयटीआयच्या पेपरफुटीची दिशा धुळ्याकडे वळली असतानाही याप्रकरणी पोलिसांचा तपास अद्याप संथगतीनेच सुरू आहे. याप्रकरणी तपासाची दिशा आता आयटीआयच्या शिक्षकांकडे वळत असून, पोलिसांनी या दिशेने तपास केल्यास पेपर फाेडणारे सूत्रधार हाती लागण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी आयटीआयच्या फिटर इलेक्ट्रीशियन या ट्रेडच्या अॅप्रेंटीसशिपची प्रश्नपत्रिका फुटली होती. याप्रकरणी एका विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल झाला असून, या विद्यार्थ्याने धुळ्याच्या शिक्षकाकडून प्रश्नपत्रिका मिळाल्याची कबुली दिली आहे. त्यानुसार संबंधित शिक्षकाच्या चौकशीसाठी गेलेल्या पोलिसांच्या हाती मात्र अद्याप काहीही लागले नसल्याची स्थिती आहे. आयटीआयमध्ये प्रश्नपत्रिका फुटण्याचा प्रकार शिक्षकांसाठी नवीन राहिलेला नाही.

काही वर्षांपासून ही स्थिती असल्याचे विद्यार्थ्यांमधून सांगितले जात आहे. मात्र, ‘दिव्य मराठी’ या प्रकाराचा दोन वर्षांपासून भंडाफोड करत असल्याने त्यातील सत्य समोर आले आहे.
आयटीआयमधील निदेशकांच्या सहभागाने हा प्रकार घडला, हे निश्चित झाले आहे. परंतु, आयटीआय प्रशासन याबाबतचा अहवाल पाठवून अलिप्ततेची भूमिका घेते. तसेच तंत्रशिक्षण विभागदेखील वरिष्ठ कार्यालयाकडे योग्य माहिती पुरवत नसल्याने डीव्हीईटीकडूनही या प्रकाराची फारशी दखल घेतली जात नसल्याचे दिसून आले आहे.

अन्य राज्यांतही साखळीची शक्यता
अॅप्रेंटीसशिपची परीक्षा पास झाल्यानंतर मोठ्या शहरांतील नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळत असते. त्यासाठी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहारही करतात. त्यात मध्यस्थ म्हणून शासकीय खासगी आयटीआयमधील शिक्षकांचाही सहभाग असतो. तो मात्र अद्याप समोर आलेला नसल्याने त्यांना अभय मिळत आहे.
देशात एकाच वेळी या परीक्षा होत असल्याने महाराष्ट्रासह शेजारील राज्यांतही शिक्षकांची साखळी आहे. एके ठिकाणाहून आलेली प्रश्नपत्रिका ते दिवस आधी मिळत असल्याने २० ते २५ हजार खर्च केले जातात. परीक्षेच्या दिवसापर्यंत प्रश्नपत्रिकेची किंमत हजारावर येते. ही प्रक्रिया विद्यार्थीही जाणून असल्याने ते परीक्षे आधीच शिक्षकांच्या संपर्कात असतात. यासह आपल्या संस्थेची गुणवत्ता कायम राहावी म्हणून या प्रश्नपत्रिका मिळवण्याचे प्रयत्न खासगी संस्थाचालकांकडूनही होतात. परिणामी, आयटीआयच्या परीक्षेचा निकाल चांगला लागत असल्याचे आजपर्यंतच्या नोंदींमधून आढळून आले आहे.

पोलिसांची भूमिका ठरणार महत्त्वाची

या प्रकरणात पोलिसांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. धुळ्याकडे वळलेला तपास पूर्ण केल्यास राज्यासह देशभरातून या प्रकाराची पाळेमुळे समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी हा तपास लावून धरण्याची गरज सुज्ञ विद्यार्थी पालकांमधून व्यक्त होत आहे.