आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात युती, आघाडीशिवाय दुसरा पर्याय नाही!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रमुख राजकीय पक्षांच्या दृष्टीने या वेळच्या जिल्हा परिषद निवडणुकीचे महत्त्व केवळ या संस्थेवर सत्ता मिळवण्यापुरते मर्यादित नाही, तर आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी केलेली राजकीय गुंतवणूक म्हणून तिचे महत्त्व अधिक आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतील यशापयशाचा सन 2014 मध्ये होणा-या सार्वत्रिक निवडणुकीचा मार्ग कठीण की सोपा हे ठरणार आहे. याशिवाय जिल्ह्यात राजकीय प्रभाव कुणाचा, या प्रश्नाचे उत्तरही या निवडणुकीतून मिळणार आहे. त्यामुळे भाजपची इच्छा नसली तरी शिवसेनेशी युती करावीच लागेल. तर मतविभागणीचा धोका टाळण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आघाडीशिवाय पर्याय नाही. मने जुळो न जुळो, तडजोड ही आता दोन्ही काँग्रेस आणि भाजप-शिवसेनेसाठी राजकीय गरज बनली आहे.
नगरपालिकांच्या निवडणुकीचा धुरळा खाली बसत नाही तोच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांना सामोरे जावे लागत आहे. गेल्या पाच वर्षांत जिल्हा परिषदेत काम करताना दोन्ही काँग्रेसला एकमेकांची गरज कधीच भासली नाही. गेली पाच वर्षे युतीमध्ये अंतर्गत धुसफूस कायम राहिली. परस्परांना उघडे पाडण्याची संधीही युतीतील कुणीही सोडली नाही. अशी स्थिती असली तरी आता निवडणुकीत मात्र दोन्ही काँग्रेसला आघाडीचे आणि भाजपला युतीचे महत्त्व वाटायला लागले आहे. निवडणुकीची गरज म्हणून या चारही प्रमुख पक्षांना स्वबळाची भाषा बोलताना आपले पाय जमिनीत किती घट्ट आहेत, हे आधी तपासावे लागणार आहे.
ग्रामीण भागात कोणत्याही राजकीय पक्षाचा सिंगल पार्टी म्हणून जिल्हाव्यापी एकतर्फी प्रभाव नाही. पंधराही तालुक्यांत राजकीय स्थिती वेगवेगळी आहे. भाजपचे नेते एकनाथ खडसे यांचा भाजपमध्ये प्रभाव आहे. शिवसेना आमदार सुरेशदादा जैन हेदेखील प्रभावशाली नेते म्हणून गणले जातात. मात्र त्यांचा प्रभाव त्यांच्या कार्यकर्त्यांपुरता मर्यादित आहे. पक्ष म्हणून त्यांच्या प्रभावाला मर्यादा आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतेच अधिक असल्याने पक्षांतर्गत सर्वमान्य नेता कोण, असा प्रश्न आहे. पालकमंत्री म्हणून गुलाबराव देवकर असले तरी पक्षाचे जिल्हा नेते म्हणून त्यांची भूमिका नाही. या तिन्ही पक्षांपेक्षा काँग्रेसची स्थिती वेगळीच आहे. तेथे नेतेच नाहीत. पक्षाचे जिल्हाध्यक्ष उदयसिंग पाटील यांनी नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व कायम राखण्यात यश मिळवले खरे; पण गटबाजी त्यांचा पिच्छा सोडण्यास तयार नाही. जिल्हा परिषदेची निवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीद्वारेच लढतील, तसे संकेत देवकर यांनी दिलेआहोत. शिवसेना आणि भाजपने यापूर्वीच्या तीन पंचवार्षिकमध्ये स्वतंत्रपणे जिल्हा परिषदेची निवडणूक लढविली आणि निवडणुकीनंतर सत्तेसाठी युती केली. ही निवडणूक शिवसेना स्वबळावर लढेल, अशी घोषणा जैन यांनी केलेली आहे. भाजपनेही सुरुवातीला स्वबळावर लढण्याची भाषा केली. मात्र तीन दिवसांपूर्वी पक्षाशी युती करू, व्यक्तीशी नाही. तालुकास्तरावरून आलेला युतीचा प्रस्ताव मान्य करू, अशी सोईस्कर विधाने आतापर्यंत केलेली आहेत. जैन आणि खडसे यांच्यात राजकीय वैर आहे. त्यामुळे ही युती होईल कशी, असा मुद्दा आहे. सध्याची राजकीय स्थिती पाहता शिवसेनेला युतीची गरज वाटत नाही, पण भावी लोकसभा व विधानसभा निवडणुकीचा विचार करता भाजपला युतीची गरज आहे, असे दिसून येत आहे.