आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐन सणासुदीला जळगावकरांना आजारपणाची भेट; खासगी भूखंड बनले घाणीचे आगार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - मालकाचा पत्ता नाही, बाहेरगावी राहतो म्हणून खर्चाची रक्कम मिळणार नसल्याने शहरातील हजारो खासगी भूखंड घाणीचे आगार बनले आहेत. पावसामुळे पाण्याचे डबके साचले असून झाडेझुडपे वाढली आहेत. साफसफाईसाठी लागणारा खर्च मिळणार नाही म्हणून पालिकेकडून स्वच्छतेकडे सर्रास दुर्लक्ष होत असून ऐन सणासुदीच्या दिवसात मलेरिया, टायफाइड आजारांची भेटच मिळत आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यात मोठय़ा प्रमाणात आजारांचे प्रस्थ वाढल्याने डेंग्यू या आजाराने थैमान घातले होते. त्यामुळे शहरात साफसफाईची मोहीम राबविण्यात आली होती. यंदा मात्र उत्सवांना सुरुवात झाली असून दसरा आठडाभरावर येऊन ठेपला आहे. वातावरणातील बदलामुळे घराघरात ताप, खोकला, सर्दीचे रुग्ण दिसत आहेत. ही सुरुवात असून वेळीच अटकाव केला नाही तर वाढ होण्याची भीती आहे. परंतु साफसफाई मोहीम तर सोडाच परंतु दैनंदिन सफाईकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

खासगी भूखंड ठरताय धोकेदायक

गेल्या तीन महिन्यात झालेल्या प्रचंड पावसामुळे शहरातील सुमारे 5 हजारापेक्षा जास्त खासगी भूखंडांमध्ये गवत व झुडपांचे साम्राज्य वाढले आहे. यामुळे डासांची उत्पत्ती होऊन आजूबाजूच्या रहिवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. भूखंड मालकाचा पत्ता नसल्याने किंवा तो मुंबई, पुणे अथवा परदेशात असल्यामुळे त्याची साफसफाई होत नाही. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे.

पालिकेचे धोरण त्रासदायक

पूर्वी पालिकेच्या माध्यमातून खासगी प्लॉट साफसफाई केली जात होती. परंतु त्यासाठी लागणारा खर्च जागा मालकांकडून दिला जात नाही. म्हणून प्रशासनाने प्रति चौरस फूट 1 रुपया प्रमाणे दर निश्चित करून तीन हजार चौरस फुटाला तीन हजार रुपये आकारण्याचा निर्णय घेतला होता. परंतु मालक उपलब्ध होत नसल्याने पालिकेने खासगी भूखंड साफ करण्याचे बंद केले आहे. मालक सापडत नाही. आर्थिक खर्च मिळणार नाही म्हणून साफसफाई करायची नाही हे पालिकेचे धोरण कितपत योग्य आहे. तसेच जळगावकरांच्या आरोग्याची काळजी कोण घेणार त्यासाठी भूखंड मालकांचा शोध घ्यावा लागेल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पालिकेने मार्ग काढावा

जर भूखंड मालकांचा पत्ता आढळ होत नसेल किं वा ते बाहेरगावी राहत असतील तर पालिकेने आधी जळगावकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता करून त्यासाठी लागलेला खर्च बांधकामाच्या परवानगीसाठी मालक आल्यानंतर ती वसुली करावी तोपर्यंत परवानगी देऊ नये यासारखे पर्यायांचा शोध घेणे गरजेचे आहे. के वळ अडचणी पुढे करून हातावर हात ठेवणे योग्य ठरणार नाही अशा भावना रहिवासी व्यक्त करीत आहेत.