आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव - वृक्षांची कत्तल करणार्यांवर कारवाई करण्यास पालिकेच्या अधिकार्यांकडून चालढकल वाढत असल्याने वृक्षतोड्यांची हिंमत वाढली आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या शेजारी असलेल्या प्लॉटमधील शेवग्याच्या शेंगांचे डेरेदार वृक्ष तोडण्यात आल्याची घटना शनिवारी झाली. या घटनेची माहिती मिळूनही पर्यावरण अधिकार्यांनी कर्तव्यात कसूर करत प्रभाग अधिकार्यांवर घोंगडे झटकण्याचा प्रयत्न केला.
महापालिकेच्या कारभाराची सूत्रे सांभाळत असलेल्या जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांच्या बंगल्यापासून एक किलो मीटर अंतरावर तर पोलिस अधीक्षक बंगल्यातून डोकावले तरी दिसेल अशा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या शेजारी शनिवारी सकाळी 10 वाजेपासून वृक्षतोड सुरू होती. या संदर्भात माहिती मिळाल्यावर ‘दिव्य मराठी’चे छायाचित्रकार घटनास्थळी पोहोचताच वृक्षातोड करणार्यांनी घटनास्थळावरून पलायन केले. वृक्षतोडीसंदर्भात परवानगी घेतली आहे काय? या बाबत बोलण्यास परिसरातील नागरिक तयार नाहीत. पालिकेतर्फे वृक्षतोड करणार्यांच्या संदर्भात मवाळ धोरण अवलंबल्याने शहरातील वृक्षतोडीच्या घटना वाढल्या आहेत. यापूर्वी ख्वाजामियाँ परिसरात तीन, एमआयडीसीत 126 झाडे तोडण्यात आली.
पर्यावरण अधिकार्यांची चुप्पी
पर्यावरण अधिकारी म्हणून चारचाकी गाडी व मिळणार्या सर्व सुविधा मिळण्याची अपेक्षा ठेवणार्या पालिका अधिकार्यांना या पदाचे जबाबदार अधिकारी म्हणून माहिती दिली असता त्यांच्याकडून कातडी बचाव करण्याचा प्रत्यय आला. वृक्षतोड होत असल्याची माहिती पर्यावरण अधिकारी दिलीप सूर्यवंशी यांना देण्यात आल्यावर ही आपली जबाबदारी नाही. या संदर्भात परिसरातील प्रभाग अधिकार्यांना माहिती कळवा, पुढील कामे तेच करणार असल्याचे सांगत सूर्यवंशी यांनी जबाबदारी झटकली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.