आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वॉर्ड रचना फुटप्रकरण; अजून दोन अधिकारी सापडले अडचणीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - महापालिकेच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेली प्रारुप वॉर्ड रचना निवडणूक आयोगातर्फे जाहीर करण्यापूर्वीच बाहेर पडली होती. याप्रकरणी ठपका ठेवत उपायुक्तांची बदली करण्यात आली असून पालिकेतील अजून दोन वरिष्ठ अधिकार्‍यांचीही लवकरच उचलबांगडी होण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने नवीन वॉर्ड रचना तयार करण्याचे काम पालिका प्रशासनाकडे सोपवले होते. प्रारुप वॉर्ड रचना करताना लोकसंख्या तसेच भौगोलिक निकष ठरवून दिले होते. पालिकेतील नगररचना, चित्रशाखा यांच्या माध्यमातून प्रारुप वॉर्ड रचना तयार करण्याचे काम झाल्यावर याचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करायचा होता. राज्य निवडणूक आयोगाकडून तपासणी केल्यावर ती जाहीर करण्यात येणार होती. त्यापूर्वीच वॉर्ड रचना शहरातील राजकीय प्रभाव असलेल्यांच्या हातात पडलेली होती.

या प्रकरणी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. तक्रारींची दखल घेत राज्य निवडणूक आयोगातर्फे उपायुक्त भालचंद्र बेहेरे यांची बदली करण्याची शिफारस राज्य शासनाकडे केली होती. राज्य शासनातर्फे शिफारशीप्रमाणे सोमवारी आदेश काढले आहेत. दरम्यान याच प्रकरणात ठपका ठेवण्यात आलेल्या दोन अधिकार्‍यांचीही बदली करण्याची शिफारस निवडणूक आयोगातर्फे करण्यात आली असून त्यांच्या बदलीच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.

उपायुक्तांकडून कार्यमुक्तीची मागणी
राज्य शासनाकडून बदलीचे आदेश प्राप्त झाल्यानंतर उपायुक्त भालचंद्र बेहेरे यांनी आपल्याला कार्यमुक्त करावे, अशा मागणीचे पत्र आयुक्त संजय कापडणीस यांना दिले आहेत. प्रशासनातर्फे त्यांना बुधवारी कार्यमुक्त केले जाण्याच्या दृष्टीने विचार सुरू आहे. बेहेरे यांच्याकडे निवडणूक विभागप्रमुख पदाची जबाबदारी असून हा पदभार तुर्त एखाद्या प्रभाग अधिकार्‍याकडे सोपवला जाऊ शकतो.