आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कर न भरल्यास थेट पगारातून कपात!, पालिका कर्मचार्‍यांसाठी प्रभारी उपायुक्तांचा आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - आर्थिक वर्ष सरत आल्याने पालिकेच्या प्रभाग अधिकार्‍यांनी शहरातील व्यावसायिक, गाळेधारक व इतर थकबाकीदारांवर कारवाईचा सपाटा चालवला आहे. दुसरीकडे पालिकेकडून पगार घेणार्‍या कर्मचार्‍यांनीच मालमत्ता कर थकवल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे कर भरण्याकडे दुर्लक्ष करणार्‍या कर्मचार्‍यांच्या पगारातूनच थकित वसुली करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.

पालिकेच्या मालमत्ता कराच्या वसुलीसाठी यंदा 56 कोटींचे उद्दिष्ट आहे; मात्र मागील थकबाकी व न्यायालयीन प्रकरणांमुळे वसुलीचा वेग मंदावला आहे. त्यामुळे जप्ती व सीलिंगसारखी कठोर कारवाई करण्याचे आदेश प्रभारी आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी दिले होते. त्यानुसार पालिकेतील चारही प्रभाग अधिकार्‍यांनी आपापल्या भागातील मोठय़ा थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. दरम्यान, सामान्य नागरिकांवर कारवाईचा सपाटा लावलेला असतानाच पालिकेच्या कर्मचार्‍यांनीही कराची रक्कम थकवली असल्याची व त्यांच्याकडून वसुली होत नसल्याची बाब प्रभारी उपायुक्त प्रवीण पंडित यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे त्यांनी चारही प्रभागांतील थकबाकीदार पालिका कर्मचार्‍यांची माहिती संकलित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार प्रभाग अधिकार्‍यांकडून ही माहिती संकलित करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. तसेच संबंधित कर्मचार्‍यांनी करभरणा करण्याबाबत दुर्लक्ष केल्यास त्यांच्या फेब्रुवारीच्या वेतनातून कराची रक्कम कपात करण्याचे आदेशही रजेवर जाण्यापूर्वी उपायुक्त पंडित यांनी दिले आहेत.

पगारापेक्षा जास्त रक्कम थकित असल्यास पुढील पगारातूनही या रकमा कापण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे.

33 कर्मचार्‍यांची माहिती संकलित

4आमच्या प्रभागात राहत असलेल्या पालिकेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांपैकी मालमत्ता कराची थकबाकी असलेल्यांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यानुसार 33 जणांकडे 3 लाख 35 हजार 665 रुपये थकले असून, तशी माहिती आस्थापना विभागाकडे सादर केली जाणार आहे. उदय पाटील, प्रभाग-1 अधिकारी

उपायुक्तांचे आदेश नुकतेच प्राप्त झाले
थकबाकीदार कर्मचार्‍यांसंदर्भातील माहिती आस्थापना विभागाकडे सादर करण्याचे उपायुक्तांचे आदेश नुकतेच प्राप्त झाले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करत संबंधित लिपिकांना माहिती संकलित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सोमवारपर्यंत ही माहिती सादर केली जाईल. सुनील भोळे, प्रभाग-2 अधिकारी