आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon Kazi In The Global Group For Brail Kuran

ब्रेल कुरआनसाठीच्या जागतिक गटात जळगावचे काझी,जगभरातून 13 सदस्यांचा समावेश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - अंधांना ब्रेल लिपीद्वारे कुरआन वाचता यावे यासाठी 13 प्रमुख राष्ट्रांतील प्रतिनिधींची एक संघटना (इंटरनॅशनल युनियन ऑफ ब्रेल कुरआन सर्व्हिसेस) काम करीत असून, या संघटनेने ब्रेल लिपीत समानता आणण्यासाठी एका अभ्यास गटाची स्थापना केली आहे. जगभरातील 13 सदस्यांच्या या अभ्यास गटात जळगावच्या प्रा.मुज्जमिलोद्दीन काझी यांचाही समावेश करण्यात आला आहे. भारतातून या संघटनेत समावेश झालेले ते एकमेव तंत्रज्ञ आहेत.
या संघटनेची 25 जानेवारीला क्वालालंपूर (मलेशिया) येथे दुसरी परिषद झाली. त्यात कुरआनसाठीच्या ब्रेल लिपीत समानता आणण्याच्या गरजेवर भर देण्यात आला. तसेच त्या अनुषंगाने एका अभ्यास गटाची स्थापनाही करण्यात आली. या गटात जळगावच्या इकरा एज्युकेशन सोसायटीच्या इकरा महाविद्यालयातील प्रा.मुज्जमिलोद्दीन काझी यांचा समावेश करण्यात आला आहे.
कोण आहेत प्रा.काझी
प्रा.काझी यांनी अंधांना ‘कुरआन शरीफ’ची माहिती व्हावी म्हणून सन 1996पासून गुजरातमधील जामनगर येथे प्रशिक्षण घेऊन त्यांना ब्रेल लिपी शिकवण्यास सुरुवात केली. 2008मध्ये मुंबईच्या ‘फाइन टच’ संस्थेने त्यांना पुढील मार्गदर्शन केले. या कार्याची दखल घेऊन फेब्रुवारी 2013मध्ये ‘इंटरनॅशनल युनियन फॉर ब्रेल कुरआन सर्व्हिसेस’ या संस्थेने त्यांची नियुक्ती केली. तुर्की देशाची राजधानी इस्तंबूल येथे झालेल्या पहिल्या परिषदेलाही ते उपस्थित होते.
अरेबियन ब्रेल लिपी वेगळी
जगभरातील अंध मुस्लिमांसाठी दरवर्षी लागणार्‍या 10 लाख ब्रेल कुरआनपैकी एकट्या सौदी अरेबियातून 5 लाख प्रती मागवण्यात येतात. अरेबियन व गैरअरेबियन राष्ट्रांतील ब्रेल लिपीत मोठी तफावत आहे. गैरअरेबियन राष्ट्रांमध्ये ब्रेल लिपी सहा बिंदूंचा आधार घेऊन तयार होते.
हे आहेत 13 देश : सौदी अरेबिया, तुर्की, येमेन, जॉर्डन, साऊथ आफ्रिका, इंग्लंड, भारत, पाकिस्तान, मलेशिया, इंडोनेशिया, इजिप्त, पॅलेस्टाइन व इराण यांचा या संघटनेत समावेश आहे.
भारत आहे अंधांचे माहेरघर : जगभरातल्या 3 कोटी 70 लाख अंधांपैकी भारतात दीड कोटी अंध व्यक्ती आहेत. त्यात मुस्लिम समाजातील अंध व्यक्तींची संख्या सुमारे 30 लाख आहे.
पाच वर्षांत परिणामांची अपेक्षा
या अभ्यास गटातील सदस्य विविध देशांतील ब्रेल लिपींचा अभ्यास करणार आहेत. ब्रेल लिपीत समानता आणण्यासाठी ते प्रस्ताव तयार करून त्यावर विचार करतील. त्यासाठी दर सहा महिन्यांनी या गटाच्या बैठका होणार आहेत. त्यातून पुढे गेलेले कार्य आगामी पाच वर्षांत पूर्णत्वास जाईल.