आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाठिंबा आतून की बाहेरून? जळगावातील राजकीय वातावरण निघतेय ढवळून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- पालिकेची निवडणूक आटोपताच सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सर्वाधिक जागा मिळवूनही कुबड्यांची गरज असलेल्या खाविआला राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळाल्यास तो बाहेरून असेल की ते सत्तेत सहभागी होतील? यावर चर्चा रंगू लागली आहे. तसेच दोन्ही गटांकडून स्थानिक पातळीवर शांतता असली तरी, वरिष्ठ पातळीवरून सुरू असलेल्या हालचालींवर सर्व समीकरणे अवलंबून राहणार आहेत.

केवळ दोन जागा असलेल्या जनक्रांतीने सत्तेत सहभागी होणार असल्याचे जाहीर केले आहे. ‘खाविआ’ला बहुमतासाठी तीन जागांची गरज भासणार आहे. मनसेकडूनही विरोधात बसण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत. त्यामुळे राजकीय मनीषा बाळगून असलेल्या राजकीय धुरिणांनी सोयीचे राजकारण कसे होईल, यादृष्टीने सोंगट्या फेकणे सुरू केले आहे. ‘खाविआ’ने कोणत्याही परिस्थितीत महापौर आमचाच असेल, हे जाहीर करून टाकले आहे. तथापि, आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुका पाहता एकमेकांच्या ताकदीची जाणीव ठेवून मदतीचा हात पुढे येण्याची शक्यता आहे.

तडजोडीचे राजकारण होणार!
आमदार सुरेश जैन व राष्ट्रवादीचे आपसात जमत नसले तरी, आगामी राजकीय वर्चस्वामुळे तडजोडीचे राजकारण होऊन राष्ट्रवादी ‘खाविआ’लाच पाठिंबा देईल, असा सूर जाणकारांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी ‘खाविआ’ला सत्तेत सहभागी होऊन की बाहेरून पाठिंबा देईल, यावर खल सुरू आहे.