आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जळगाव: उमेदवारांच्या नजरा पक्ष निधीकडे; श्रेष्ठींच्या भूमिकेकडे लागले लक्ष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- निवडणूक लढणे सर्वसामान्यांचे काम नाही असे नेहमीच म्हटले जाते, कारण उमेदवारी करताना धनदांडग्यांसोबत सामान्यांचा सामना असतो. पालिका निवडणुकीत उमेदवारी देताना पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन देणार्‍या नेत्यांना आता उमेदवारांकडून होणार्‍या पाठपुराव्याने हैराण केले आहे. मतदान सहा दिवसांवर येऊन ठेपले आहे. अजून पक्षांकडून कोणताच निधी प्राप्त न झाल्याने श्रेष्ठींच्या हालचालींकडे लक्ष लागून आहे.

निवडणुकीसाठी सर्वच पक्षांना 75 उमेदवार देताना मोठी कसरत करावी लागली. त्यात एकाही पक्षाला संपूर्ण जागांवर उमेदवार देणे शक्य झाले नाही. त्यातही पुरुषांसोबत महिला उमेदवार देताना करावी लागणारी मनधरणी वेगळीच होती. परंतु एखाद्या भागात सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या चेहर्‍यांना हेरून पक्षाची उमेदवारी देण्याची तयारी दाखविण्यात आली. या दरम्यान पक्ष आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून पाठबळ देईल असे सांगण्यात आले होते. सर्वतोपरी मदत याचा अर्थ अनेकांनी आर्थिक बाजूचाही लावला. आता मतदान पाच दिवसांवर येऊन ठेपले आहे. हातचा पैसा संपायला आला आहे. महत्त्वाचे दिवस बाकी आहेत. त्यामुळे पक्षाकडून अद्याप निधी प्राप्त झालेला नसल्याने काही उमेदवार पक्ष कार्यालयात जाऊन र्शेष्ठींकडे विचारणा करू लागले आहेत.

खर्च होतोय मोठा; मात्र दाखवला जातोय छोटा

तपासणीसाठी 21 जणांचा ताफा
उमेदवारांकडून केल्या जाणार्‍या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी आचारसंहिता कक्ष प्रमुख उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे यांच्यासोबत 21 अधिकारी, कर्मचार्‍यांचा ताफा आहे. तत्काळ घटनास्थळी पोचण्यासाठी या विभागाकडे 8 वाहने देण्यात आली आहेत. आचारसंहितेचा भंग होत असल्यास ते टिपण्यासाठी 21 व्हिडिओग्राफर त्यांच्यासोबत आहेत. एखाद्या उमेदवाराने प्रचारासाठी प्रचार पत्रके, होर्डिंग्ज, गळपट्टे, छापिल बनियन आदी गोष्टी केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित पथक याच्या खर्चासंदर्भातील बिलांची मागणी करू शकते.

मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैशांची वारेमाप उधळपट्टी
महापालिका निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांकडून प्रचारावर आणि मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रचंड पैसा खर्च केला जात आहे. तीन लाखांपर्यंत खर्चाची र्मयादा असली तरीही प्रत्यक्षात खर्च दाखल करताना तुटपुंजा दाखवला जात आहे. उमेदवारांच्या खर्चाचा हिशेब तपासण्याची जबाबदारी असणार्‍या आचारसंहिता विभागाकडून कानाडोळा केला जात असल्याची स्थिती आहे.

निवडणूक प्रचारासाठी चार दिवस शिल्लक असल्याने उमेदवारांकडून जोर लावला जात आहे. प्रचार रॅलीत फिरणार्‍या तरुणांना आकर्षित करण्यासाठी छापिल बनियन वाटप केले जात आहेत. झेंडे, प्रचाराचे साहित्य, बहुरंगी प्रचार पत्रक यांचा मोठय़ा प्रमाणात वापर केला जात आहे. प्रचार पत्रकावर प्रकाशक आणि किती प्रती छापल्या आहेत, याची माहिती देणे बंधनकारक असते. प्रत्येक वॉर्डात सरासरी आठ ते दहा हजार मतदार असताना खर्च कमी दाखविण्यासाठी पत्रकांचा आकडा सरसकट 1 हजार दाखविण्यात येतो. आचारसंहिता भंग होत नसल्याची पाहणी करण्यासाठी पथकांकडून या बाबींची तपासणी करणे अपेक्षित आहे. शहरात फिरस्ती करणार्‍या पथकाकडून याबाबींची तपासणी बारकाईने केल्यास उमेदवारी खर्चाचा प्रत्यक्ष आकडा समोर येऊ शकतो.