आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव महापालिका ‘इलेक्शन ड्यूटी’मुळे अधिकारी मतदानापासून वंचित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- मतदानासाठी नियुक्त केलेल्या कर्मचार्‍यांना टपाली मतदानाची व्यवस्था निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडून करण्यात आली होती. मात्र, अनेक अधिकारी, कर्मचार्‍यांना टपाली मतपत्रिका मिळालीच नाही. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी थेट आयुक्तांपर्यंत प्रयत्न करणार्‍या दोन शिक्षकांना मतमोजणीनंतर दुसर्‍या दिवशी टपाली मतपत्रिका मिळाल्याने ते मतदानापासून वंचित राहिले.

मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर नियुक्ती करण्यात आलेले शिक्षक गणेश लोडते आणि भूषण जोगी यांना टपाली मतपत्रिका मिळाली नाही. मतदानाच्या दिवशी त्यांनी केंद्राला भेट देणारे निवडणूक निर्णय अधिकारी तुकाराम हुलवळे, झोनल अधिकारी अ.वा.जाधव आणि खुद्द मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी संजय कापडणीस यांच्याकडेही मतपत्रिका मिळाली नसल्याचे सांगितले. मतदान करण्यासाठी पर्यायी व्यवस्थेबाबतही विचारणा केली. मात्र, पोस्ट खात्यावर पूर्ण विश्वास असलेल्या अधिकार्‍यांनी त्यांना वाट पाहण्याचा सल्ला दिला.

अधिकार्‍यांना सांगूनही उपयोग नाही
टपाली मतदानाच्या मतपत्रिका अजूनही पोहचल्या नसल्याबाबत त्या शिक्षकांनी मतदान केंद्राला भेट देणार्‍या प्रत्येक अधिकार्‍यांच्या कानावर ही गोष्ट टाकली. टपाली मतदान पत्रिका आली नसल्याने हक्क बजावण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी केली. परंतु अधिकार्‍यांनी सायंकाळपर्यंत मतपत्रिका घरी येऊन जाईल, असे सांगत विषय टाळण्याचा प्रयत्न केला.

आयुक्तांकडूनही दुर्लक्ष
संबंधित शिक्षकांनी मतदानाच्या हक्कापासून वंचित राहत असल्याबाबत थेट आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजय कापडणीस यांच्याशीदेखील संपर्क साधला परंतु उपयोग झाला नाही.

मतमोजणीनंतर मिळाल्या मतपत्रिका
आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे वाट पाहत असलेल्या शिक्षकांना मतमोजणीनंतर दुसर्‍या दिवशी टपाली मतपत्रिका मिळाल्या. तो पर्यंत वेळ निघून गेलेली असल्याने त्या शिक्षकांना मतदानाच्या हक्कापासून वंचित रहावे लागले. तक्रारीसाठी पुढे न आलेले अनेक कर्मचारी या हक्कापासून वंचित राहिल्याचे त्यांचे म्हणणे आहे.