आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘खाविआ’ची भूमिका उद्या ठरणार; बिनशर्त पाठिंब्यावर सत्तेचे गणित अवलंबून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- महापालिकेतील सत्तेचा निर्णय गणेशोत्सवादरम्यान होणार आहे. बिनशर्त पाठिंबा मिळत असेल तर सत्तेत यावे असा विचार खान्देश विकास आघाडीतून व्यक्त होत आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीकडूनही लोकसभा डोळ्यासमोर ठेवून बिनशर्त पाठिंब्याची तयारी सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सत्तेच्या गणितांच्या जुळवणीसंदर्भात मंगळवारी खान्देश विकास आघाडीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक होणार आहे.

पहिल्यांदाच ताकद अजमावलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ‘दिल से’ वागणूक मिळत आहे. त्यामुळे सर्वाधिक जागा मिळवून सत्तेच्या उंबरठय़ावर पोहचलेल्या खाविआला राष्ट्रवादीचाच पाठिंबा मिळेल यावर लवकरच शिक्कामोर्तब होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. नवनिर्वाचित नगरसेवकांचा ओळख परिचय करण्यासाठी खाविआने मंगळवारी सायंकाळी 5 वाजता ‘7 शिवाजीनगर’ येथे बैठकीचे आयोजन केले आहे. शहराच्या विकासाचा अजेंडा हाती घेतलेल्या खाविआने बिनशर्त पाठिंबा मिळत असेल तर सत्तेत जावे असाही विचार काही नगरसेवकांकडून व्यक्त होत आहे. राष्ट्रवादीला देखील सत्तेत सहभागी होण्यापेक्षा लोकसभेची जागा मिळविण्यात रस असल्याने तसेच निरोप दिले जात असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

शिवसेना अलिप्त
निवडणुकीपूर्वी खान्देश विकास आघाडी म्हणजेच शिवसेना अशी भूमिका असलेले पदाधिकारी मात्र ऐनवेळी निवडणुकीपासून अलिप्त झाले होते. आता सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेपासूनही शिवसेनेचे पदाधिकारी दूरच असल्याचे दिसते. राष्ट्रवादीचा पाठिंबा घेण्याच्या मुद्यावर शिवसेना नेमकी काय भूमिका घेते याकडेही लक्ष लागून आहे. पुणे पॅटर्नचा विचार करता खाविआची म्हणजेच शिवसेनेची सत्ता येत असेल तर राष्ट्रवादीचाही पाठिंबा घेण्यास हरकत नसल्याचे बोलले जात आहे.

सोनवणे होणार महापौर?
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवत खान्देश विकास आघाडीचे नेते आमदार सुरेश जैन हेच आगामी महापौरसंदर्भात निर्णय घेणार आहेत. यात सोनवणेंचे नाव आघाडीवर आहे. त्यामुळे भारती सोनवणे की राखी सोनवणे यापैकी कोणाला महापौरपदाची संधी मिळते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.