आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावच्या महापौरांचा दिवा गुल; अंबर दिव्याबाबत गृहखात्याचे नवे अध्यादेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- महापौरांच्या प्रतिष्ठेत भर घालणार्‍या ‘लाल दिव्या’ला गृह खात्याने लाल झेंडी दाखवली असून क आणि ड वर्ग महापालिका आयुक्तांनाही या नव्या निर्णयामुळे आता अंबर दिवा गाडीवर लावून मिरवता येणार नाही. त्यामुळे ‘लाल दिव्या’चे स्वप्न पाहाणार्‍या जळगावच्या संभाव्य महापौरांचा हिरमोड होणार आहे.

गृह विभागाच्या सहसचिवांनी 17 ऑगस्ट रोजी अंबर दिवा कोण कशा पद्धतीने वापरू शकेल, या संदर्भातली नवी अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार केवळ ‘अ’ आणि ‘ब’ वर्ग महापालिकांचे महापौर आणि आयुक्त त्यांच्या शासकीय वाहनावरच अंबर दिवा वापरू शकतील. शिवाय असा दिवा लावण्याबाबतची परवानगी असलेले स्टीकरही वाहनावर चिकटवावे लागणार आहे.

‘क’ व ‘ड’ वर्गाच्या आयुक्तांनाही तोच नियम
जळगाव महानगरपालिकेच्या आतापर्यंतच्या नऊ महापौरांना लाल दिव्याच्या गाडीतून प्रवास करण्याचे सौख्य लाभले; परंतु आता नवीन निकषानुसार ‘ड’ वर्ग महापालिकांना अधिसूचनेत स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे जळगावच्या महापौरांना गाडीवरच्या लाल दिव्याला मुकावे लागणार आहे. रामनाथ सोनवणे जळगाव महापालिकेचे आयुक्त असताना त्यांच्या गाडीवर लाल दिवा लावायला विरोध करण्यात आला होता. आता तसा अध्यादेशच काढण्यात आल्यामुळे सध्याच्या आयुक्तांनाही अंबर दिव्याला मुकावे लागणार आहे.

विद्यमान महापौरही
गृह विभागाने जारी केलेल्या अध्यादेशानुसार 17 ऑगस्ट नंतर क आणि ड वर्ग महापालिकेच्या महापौरांनी लाल दिवा वापरणे बेकायदेशीर ठरविण्यात आले आहे. त्यामुळे जळगावचे विद्यमान महापौर किशोर पाटील यांना त्यांच्या खासगी वाहनावर लावलेला प्रतिष्ठेचा लाल दिवा आता तातडीने काढून घ्यावा लागणार आहे.

असे दिवे विकण्यावर बंदी
अशा दिव्यांचा होणारा गैरवापर टाळण्यासाठी यापुढे हे दिवे संबंधितांना केवळ शासकीय परिवहन सेवेमार्फत किंवा पोलिस मोटार परिवहन विभागामार्फतच दिले जातील. त्यामुळे यापुढे अशा दिव्यांची विक्री खासगी दुकानातून करण्यावर कायदेशीर बंदी लागू करण्यात आली आहे.