आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातवा कौन? नवा महापौर ऐनवेळी जाहीर करण्याचे संकेत

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- महापालिकेच्या शुक्रवारी महासभेत महापौर जयश्री धांडे यांनी राजीनामा सादर केला. त्यामुळे चालू पंचवार्षिकमध्ये सातव्या महापौरपदाच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नवीन महापौर निवडीच्या दृष्टीने प्रशासनाकडूनही तातडीने पावले उचलली जात आहेत. विभागीय आयुक्तांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याच्या प्रस्तावावर शुक्रवारी सायंकाळीच जिल्हाधिकार्‍यांची स्वाक्षरी झाली आहे. मात्र, नव्या महापौरांचे नाव आधीच जाहीर करून नाराजी ओढविण्यापेक्षा ऐनवेळी महापौर निवड करण्याची खान्देश विकास आघाडीकडून शक्यता आहे.

पुढील पंचवार्षिकमध्ये महापौरपद महिला राखीव असल्याने शेवटी पुरुष नगरसेवकांना संधी देण्याचे सत्ताधार्‍यांनी ठरवले आहे. यासाठी सुनील महाजन व किशोर पाटील दोन्हीही दावेदार असले तरी महाजन यांची ही पहिलीच टर्म आहे. तर ज्येष्ठांना संधी देण्याचा विषय वरिष्ठांकडूनच घेण्यात आला आहे. पालिकेतील आर्थिक स्थिती पाहता किशोर पाटील यांचा मंत्रालयातील दांडग्या संपर्काचा फायदा सत्ताधार्‍यांना करून घेता येणार आहे. त्यामुळे त्यांना संधी दिली जाईल, असे सत्ताधार्‍यांच्या गोटात चर्चीले जात आहे. विद्यमान महापौरांचे नाव लवकर जाहीर झाल्यास इतरांची नाराजी ओढवून घेण्यापेक्षा र्शेष्ठींकडून अद्याप निर्णय झाला नसल्याचा दावा खान्देश विकास आघाडीकडून करण्यात येत आहे.

महिला सदस्यांची मनधरणी
खान्देश विकास आघाडीतर्फे महापौरपदासाठी किशोर पाटील यांचे नाव निश्चित झाल्याचे मानले जात असताना आघाडीतील ज्येष्ठ नगरसेविकांनी आम्हालाही संधी मिळावी, अशी विनंती केली आहे. यात पुष्पा पाटील, सिंधू कोल्हे, लता भोईटे या ज्येष्ठ नगरसेविका असून त्यांच्या नावाचा विचार व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. इच्छुकांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता निवड प्रक्रिया पार पडेपर्यंत नाराजांची मने वळवण्याचे आव्हान आघाडीतील नेत्यांसमोर आहे.