आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Jalgaon Mlc Byelection, Bjp\'s Gurumukh Jagwani New Mlc Member

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

NEWS @ MH: जळगाव विधान परिषदेची 100 कोटींची पोटनिवडणूक बिनविरोध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जळगाव विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरलेल्या भाजपने तब्बल 10 उमेदवारांनी माघार घ्यावी, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. शेवटच्या क्षणापर्यंत सुरू असलेल्या आर्थिक, राजकीय वाटाघाटींना यश आल्याने डॉ. गुरूमुख जगवाणी या निवडणुकीत बिनविरोध विजयी झाले आहेत. रिंगणात असलेल्या विविध राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी देखील भाजप पुढे सपशेल नांगी टाकून आज अखेर आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. जळगाव विधान परिषदेची निवडणूक ही 100 कोटींची म्हणून ओळखली जाते. गेल्या वेळीस काँग्रेसचे उमेदवार मनिष जैन यांनी ही निवडणूक जिंकण्यासाठी 100 कोटी खर्च केल्याची चर्चा होती. पोटनिवडणुकीतही तसाच प्रकार घडेल अशी चर्चा असतानाच ही निवडणूक खडसे-महाजनांच्या व्यूहरचनेमुळे बिनविरोध झाली आहे.
राष्ट्रवादीचा उमेदवार स्पर्धेतून बाद झाल्यानंतर भाजपचे मिशन बिनविरोध सुरू झाले. परिषदेच्या 524 मतदारांना सांभाळण्यापेक्षा 10 उमेदवारांकडे लक्ष देणे अधिक सोईचे असल्याने डॉ. जगवाणी बिनविरोधसाठी आग्रही होते. राजकीयदृष्ट्या बिनविरोधमुळे आणखी एक पराक्रमाचा तुरा शिरपेचात रोवला जाणार असल्याने खडसे-महाजन जोडी एकत्र आली. गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखालील टीममध्ये उमेदवार गुरुमुख जगवाणी, खासदार ए. टी. पाटील, अनिल चौधरी, गोविंद अग्रवाल आणि इतर पदाधिकारी शुक्रवारी सकाळपासूनच या कामाला लागले होते.
कैलास पाटलांची काढली समजूत : खडसेंनी उद्घव ठाकरेंशी चर्चा करूनही शिवसेनेने माघार घेण्यास नकार दिला होता. गुरुवारी राजकीय वाटाघाटीनंतरही कैलास पाटील यांचे आव्हान कायम होते. जिल्हाध्यक्ष म्हणून किशोर पाटील त्यांची समजूत काढत होते. भाजपची टीम त्यांना घेऊन दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आली. अर्जावर स्वाक्षरी करेपर्यंत कैलास पाटील नकार देत होते. जगवाणी, महाजन आणि किशोर पाटील यांनी प्रेमळ दबावाने त्यांच्याकडून स्वाक्षरी करून घेतली. माघारीनंतरही नाराज कैलास पाटलांची बराच वेळ समजूत काढावी लागली.
काँग्रेसने घातले लोटांगण- राष्ट्रवादी हा मित्रपक्ष स्पर्धेत नसल्याने त्यांच्या पाठिंब्यावर विधान परिषद लढण्याची संधी कॉँग्रेसला चालून आली होती. मात्र, त्यांनी खडसे -महाजनांपुढे सपशेल माघार घेणेच पसंत केले.

नवा इतिहास रचला- स्पर्धेतील सगळ्या उमेदवारांना निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आवाहन केले होते. त्याला सगळ्यांनी प्रतिसाद दिल्याने भाजपचा उमेदवार विजयी झाला. बिनविरोध निवडीमुळे जिल्ह्यात एक नवा इतिहास रचला गेला असून हा चांगला पायंडा पडला आहे. एकनाथ खडसे, विरोधी पक्षनेता, विधानसभा.
नांग्या टाकल्याने घोडेबाजाराची शंका- तांत्रिक अडचणीमुळे आमचा उमेदवार बाद ठरला. तरीही तब्बल 12 जण रिंगणात होते. त्यापैकी एकही उमेदवार स्पर्धेत राहिला नाही हे दुर्दैव आहे. या प्रकारात मोठय़ा प्रमाणावर घोडेबाजाराची शंका येते. माघार घेताना उमेदवारांनी अशरश: नांग्या टाकल्या. - ईश्वरलाल जैन, खासदार, राज्यसभा.
शेवटच्या तीन मिनिटात झाली मोहीम फत्ते- खाविआ आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये निवडणुकीची सरळ लढत होईल, अशी स्थिती होती. प्रशासनाकडूनही निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने पुढील हालचाली सुरू होत्या. अवघे तीन मिनिट बाकी असताना रमेश जैन यांच्या बंगल्यावरून आलेली गिरीश महाजन यांची गाडी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाली. त्यांच्यासोबत बसलेले खाविआचे उमेदवार कैलास सोनवणे यांचा हात धरून महाजन गाडीच्या बाहेर पडले. गाडीतून उतरण्यास तयार नसलेल्या सोनवणे यांच्या कमरेला मिठी मारून महाजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायर्‍या चढले. जिल्हाधिकार्‍यांपुढे गेल्यानंतरच महाजनांनी सोनवणेंचा घट्ट पकडलेला हात सोडला. त्यानंतर सोनवणेंनी माघारीचा अर्ज भरून दिला तर विष्णू भंगाळे यांनी यापूर्वीच माघार घेतली होती. जगवाणींनी याबद्दल त्यांचे विशेष आभार मानले.
छायाचित्र- निवडणुकीनंतर खडसे यांच्या निवासस्थानी बसलेले नेते....
पुढे वाचा, ओली पार्टी करून शिक्षकांनी घातला शाळेतच धिंगाणा...