जळगाव - शहरातील संपूर्ण स्वच्छतेसाठी नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात अालेल्या ईएसबीएम प्रणाली इंग्रजीत असल्याने सामान्य माणसाला तक्रारी करताना अडचणी येत अाहेत. त्यामुळे माेबाइल हाताळता येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला साेप्या पद्धतीने तक्रार करता यावी यासाठी अाता हे अॅप्स मराठीत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न हाेताेय. तक्रारीसाेबत फाेटाे टाकला जात नसल्याने फाेटाे बंधनकारक करण्यात येत अाहे.
संपूर्ण शहर १०० टक्के स्वच्छतेच्या दृष्टीने पालिका प्रशासनाने अाराेग्य विभागासाेबत अाता सर्व अभियंत्यांनाही कामाला लावले अाहे. प्रत्येक वाॅर्ड अधिकाऱ्यांना दत्तक देण्यात अाला असून घंटागाडीचा रूट तपासणे, कचरा उचलला की नाही याचा अहवाल देणे बंधनकारक करण्यात अाले अाहे. या व्यतिरिक्त जर कुठे कचरा साचलेला असेल तसेच कचराकुंडी अाेसंडून वाहत असेल तर त्याची तक्रार करण्यासाठी नागरिकांना ईएसबीएम प्रणाली उपलब्ध करून देण्यात अाली अाहे. यावर नागरिकांना घरबसल्या तक्रारी करता येत अाहेत.
जानेवारी ते १३ जानेवारीदरम्यान ११८ तक्रारी दाखल झाल्या असून ८० तक्रारी निकाली काढण्यात अाल्या. ४८ तासांत तक्रारीचे निरसन हाेणे अपेक्षित असताना अजूनही अनेक कर्मचाऱ्यांना या प्रणालीचा वापर करणे अवघड जात अाहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त अॅप्सचा वापर करण्याच्या सूचना देण्यात अाल्या अाहेत. याशिवाय बहुसंख्य नागरिकांना इंग्रजीतील माहिती कळत नसल्याने शहरातील सर्वसाधारण माणूस या प्रणालीशी जुळण्याच्या दृष्टीने अाता मराठीतही सेवा देण्याची तयारी पालिका प्रशासनाने सुरू केली अाहे. लवकरच ही यंत्रणा देखील सुरू हाेणार अाहे. त्याचा मोठा फायदा शहरवासीयांना होणार असून हे अॅप्स एकप्रकारे कचरामुक्त शहर संकल्पनेसाठी फायदेशीर ठरेल.
जेवढ्या तक्रारी तेवढी सेवा चांगली
नागरिकांनी या अॅप्सचा जास्तीत जास्त वापर करण्याचे अावाहन पालिकेच्या माध्यमातून करण्यात येत अाहे. हे तंत्रज्ञान विकसित करताना नागरिकांना केंद्रस्थानी ठेवण्यात अाले अाहे. नागरिकांनी जेवढ्या जास्त तक्रारी केल्या तेवढा सेवेचा स्तर उंचावणार अाहे.
पालिकेच्या वेबसाइटवरूनही तक्रारी
महापालिकेच्यावेबसाइटवरूनही अाता नागरिकांच्या अस्वच्छतेच्या तक्रारी करता येणार अाहेत. पालिकेच्या www.jcmc.gov.in या वेबसाइटवर esbm वर क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी कचरा उचलला की नाही, घनकचरा वाहनांची गती, नागरिकांच्या तक्रारी निकाली निघाल्याचे प्रमाण, कचराकुंडी महिन्यातून किती वेळा साफ झाली याबाबत संपूर्ण शहराची माहिती घेता येणार अाहे.