आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य, बांधकामाच्या मुद्यावर अधिकाऱ्यांना धरले धारेवर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महापालिकेने पावसाळ्यात वाढणारे साथीचे आजार रोखण्यासाठी स्वच्छतेची कामे हाती घ्यावी, यासह रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये बांधकामाचे साहित्य टाकणे, तसेच वाहनांची अपूर्ण संख्या कर्मचाऱ्यांकडून कामे करण्याकामी होत असलेली टाळाटाळ, याविषयी महापालिका स्थायी समिती सदस्यांनी आक्रमक मुद्दे मांडत प्रभारी आयुक्तांसमोर आरोग्य, बांधकाम, वाहन, वीज विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. प्रभारी आयुक्त किशोर राजेनिंबाळकर यांनी अधिकाऱ्यांना तंबी देत कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले. विषयपत्रिकेतील विषयांना मंजुरीनंतर आयत्यावेळच्या विषयावर चर्चा झाली. 
 
सुरुवातीस नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी २५ कोटींच्या निधीत जीएसटीमुळे कोणती कामे घ्यावीत, कोणती टाळावी, याबाबतची माहिती दिवसांत देण्याची मागणी केली. स्वच्छता विभागातील कंटेनरच्या झालेल्या चोरीबाबत अधिकाऱ्यांची कामाप्रती उदासीनता दिसून आल्याचे स्पष्ट केले. या वेळी सहायक आयुक्त लक्ष्मीकांत कहार, उपायुक्त चंद्रकांत कोसे,नगरसचिव अनिल वानखेडे उपस्थित होते. 

घंटागाडी वाहनांचा हिशोबच नाही 
घंटागाडीसह ट्रॅक्टर अन्य वाहने दिवसभर कोणत्या भागात फिरतात, याविषयी कोणतीही नोंद ठेवली जात नाही. जीपीएस यंत्रणा गेल्या १० दिवसांपासून बंद आहे. नगरसेवकांनी वाहनांची मागणी करूनही अधिकाऱ्यांकडून विविध कारणे दाखवली जात असल्याची तक्रार चेतन शिरसाळे यांनी मांडली. महापालिकेत असलेल्या वाहनांच्या अल्प संख्येमुळे अडचणी येत असल्याचे नितीन बरडे यांनी सांगितले. डबक्यांमध्ये वेस्ट मटेरिअल टाकले जाते. मात्र, ते रोलिंग केले जात नसल्याने अपघात होत असल्याची तक्रार नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे यांनी मांडली. रस्त्यावर पडलेले बांधकाम साहित्याबाबत कारवाई होत नाही. अभियंते शहरात फिरतच नसल्याचेही या वेळी सांगण्यात आले. 

शहरात डेंग्यूचा फैलाव 
जयनगरात डेंग्यूचे दोन रूग्ण आढळले असून अनेकदा पाठपुरावा करूनही धूळ फवारणी केली जात नसल्याची तक्रार अनंत जोशी यांनी केली.फवारणीत अॅबेटिंग अन्य रसायनांचा योग्य प्रमाणात वापर होत नाही. शहरात डेंग्यूचा अधिक फैलाव होण्याआधीच धूळ फवारणी करावी, अशी मागणी केली. यासह कचरा भरलेला ट्रॅक्टरची वाहतूक ही ताडपत्री ठेवून करावी, अशी मागणी नगरसेविका ज्योती इंगळे यांनी केली. स्वच्छता अभियानावेळी गैरहजर कर्मचाऱ्यांची संख्या ही अधिक असते. यामुळे ही मोहीम पूर्ण होत नसल्याने रजेचे नियोजन करण्याची मागणी नवनाथ दारकुंडे यांनी केली. या वेळी सभापती वर्षा खडके यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना जाब विचारत पुरेशी माहिती ठेवून सभागृहात येण्याच्या सूचना दिल्या. 
 
बातम्या आणखी आहेत...