आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जळगावचे आमदार, खासदार म्हणजे मोदी लाटेवर तरंगणारे ओंडके

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जळगावचे आमदार, खासदार स्वत:च्या भरवशावर निवडून आले नाहीत तर, मोदी लाटेवर तरंगणारे ओंडके आहेत. त्यांनी जनतेसमोर जावे तेंव्हा लायकी कळेल. तीन वर्षांनंतर शहरात मत मागण्यासाठी आले तर त्यांच्या अंगावर कुत्री सोडू, अशा शब्दांमध्ये शनिवारी महापालिकेच्या विशेष सभेत सत्ताधारी खान्देश विकास आघाडी, मनसे यांनी भाजपचे खासदार ए.टी.पाटील यांच्यावर तोंडसुख घेतले. महापालिकेतील सत्ताधारी हे ‘भुंकणारे कुत्रे’ आहेत, अशा शिवराळ भाषेत गेल्या शनिवारी खासदार पाटील यांनी जिल्हा संनियंत्रण बैठकीत खाविआ नेत्यांवर टीका केली होती. त्याचबरोबर आमदार सुरेश भोळे यांनीही अतिक्रमण हटावच्या मुद्यावर हाकर्सची बाजू घेत सत्ताधारी आणि महापालिकेवर सुपारी घेतल्याचा आरोप केला होता.भाजप खासदार आणि अामदारांच्या या वक्तव्यांचे संतप्त पडसाद शनिवारी विशेष महासभेत उमटले. त्यांच्या निषेधाचा ठरावही बहुमताने मंजूर करण्यात आला आहे.

शनिवारी महापालिकेची विशेष महासभा बोलावण्यात आली होती. या सभेत आठ विषयांवर चर्चा झाली. तत्पूर्वी पाचव्या क्रमांकाचा विषय शहरातील मोकाट कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासंदर्भात चर्चेसाठी होता. हा विषय समोर येताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक अनंत जोशी यांनी माइकचा ताबा घेतला. ‘कुत्र्यांमुळे सन्माननीय खासदार आठवले,’ अशी सुरुवात त्यांनी केली. त्यानंतर जोशी यांच्यासह महापौर नितीन लढ्ढा, गटनेता गणेश सोनवणे,भागचंद जैन यांच्यासह अनेकांनी खासदार पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करीत तोंडसुख घेतले. पाटील हे शहराचे खासदार आहेत. नागरिकांच्या समस्या मांडून त्याचा पाठपुरावा करणे, आठवण करून देणे, याला जर ते भुंकणे म्हणत असतील तर आम्ही हजार वेळा भुंकायला तयार आहोत, असे सांगून अनेक प्रकारची कुत्री असतात, आम्ही केवळ भुंकणारे नसून चावणारे देखील आहोत, चावायला कमी करणार नाही, असा इशारा संतप्त नगरसेवकांनी दिला.

खासदार,आमदारांची लायकी काढली : महापालिकेवालेभुंकणारे कुत्रे आहेत, अशी टीका करणाऱ्या खासदार पाटील यांची नगरसेवकांनी लायकी काढली. पाटील यांना उद्देशून ते म्हणाले, जनतेसमोर जा मग आपली लायकी कळेल . तुम्ही स्वत:च्या भरवशावर नव्हे तर मोदी लाटेवर निवडून आलेले ओंडके आहात. राज्यात आणि केंद्रात सत्ता असूनही आमदार, खासदारांची वरिष्ठांकडे पत नाही. त्यामुळे ते निधी आणू शकत नाहीत, जनतेची कामे करू शकत नाहीत. सत्ताधारी गट काम करीत असल्यामुळे त्यांना पचनी पडत नाही. म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकते आहे. केवळ श्रेय लाटण्याचे काम ते करतात. तीन वर्षांनंतर त्यांना आमचीच गरज पडणार आहे. तेंव्हा आमच्याकडे आलाततर अंगावर कुत्री सोडू, असा इशाराही सत्ताधारी नगरसेवकांनी दिला. संतापाच्या भरात खासदार पाटील यांना ‘शोले’ चित्रपटातील ‘बसंती’चीही उपमा देण्यात आली. चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये डाकू गब्बरसिंग समोर बसंती नाचते. त्याचा संदर्भ देऊन तुम्हाला तीन वर्षांनी आमच्या समोर नाचायचे आहे, याचीही आठवण त्यांनी खासदारांना करून दिली. या वेळी ‘शेम... शेम’ अशा घोषणा देण्यात आल्या.

खासदार संसदेत बोलू शकत नाहीत म्हणून प्राणी संग्रहालयात जास्त वेळ देतात, असा टोला महापौर लढ्ढा यांनी लगावला. खासदारांनी छोट्या विषयांमध्ये हात घालण्यापेक्षा गाळे लिलावासारखे मोठे विषय मार्गी लावले पाहिजेत. खाविआ गटनेते गणेश सोनवणे, भागचंद जैन यांनी खासदार पाटील यांचा निषेध करून त्यांनी माफी मागावी, अशी मागणी केली.

आमदार फक्त नावाचे ‘भोळे’?
आमदारसुरेश भोळे हे खरेच ‘भोळे’ आहेत की फक्त नावाचे भोळे आहेत, असा प्रश्न जोशी यांनी हॉकर्सच्या विषयावरून उपस्थित केला. आमदार भोळे हे फुले मार्केटच्या समोरील जैन मंदिराचे अतिक्रमण काढण्यासाठी अधिकाऱ्यांना स्वत: फोन करतात. तर दुसरीकडे आम्ही हॉकर्सचे स्थलांतर करून त्यांना पर्यायी जागा देतो आहोत. त्यांच्या उपजीविकेची काळजी आम्हालाही आहे. तरी देखील त्या हॉकर्सला ते चावतात. आम्ही सुपारी घेतली आहे, असा आरोप आमदार आमच्यावर करीत आहेत. आमदारांची ही दुटप्पी भूमिका लक्षात येत नाही, अडीच हजार हॉकर्ससाठी राजकारण करण्यापेक्षा पाच लाख लोकांचा विचार अामदारांनी करावा, असा टोलाही जोशी यांनी लगावला.
जिल्हा संनियंत्रण बैठकीत काय बोलले खासदार-आमदार
गोलाणी मार्केटही पर्यायी जागा ठरू शकत नाही (मनपा आयुक्त) तुम्ही कुणाच्या तरी सांगण्यावरून काम करीत आहात. रस्त्यावर चालणाऱ्या लोकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नाबरोबर हॉकर्सच्या पोटापाण्याचाही प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यांच्या पोटावर पाय देण्याचा प्रयत्न करू नका.कुणाकडून सुपारी घेतल्यासारखे वागू नका. सुरेशभोळे, आमदार

खासदार कामे करीत नसल्याबाबत बातम्या काही मंडळींनी वृत्तपत्रात छापून आणल्या. त्यांना तेवढेच काम आहे. मात्र, तीच मंडळी जळगाव खाऊन गेलेत आणि आता तेच खासदारांच्या नावाने काम करीत नसल्याचे कुत्र्यासारखे ओरडत आहेत. खासदार कामे करत नाहीत तर काय करतात. ए.टी.पाटील, खासदार
बातम्या आणखी आहेत...