आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जळगाव: व्यापारी संकुलातील गाळ्यांसंदर्भात महापालिकेतर्फे नोटीस बजावून सुनावणी करण्यासाठी वेळ देऊनही वेळोवेळी यात बदल करण्यात येत आहे. यामुळे व्यापार्यांना प्रचंड मनस्ताप होत असून मंगळवारी संतप्त व्यापार्यांनी महापालिकेवर मोर्चा काढला. फुले मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष अशोक मंधान व पदाधिकार्यांतर्फे अधिकार्यांची मनमानी बंद करण्याची मागणी या वेळी करण्यात आली.
शहरातील व्यापारी संकुलांच्या गाळ्यांच्या कराराची मुदत 31 मार्च रोजी संपली आहे. त्यानंतर प्रशासनातर्फे सद्याच्या बाजारभावाप्रमाणे प्रीमियम आकारणी करून 99 वर्षांच्या कराराने दुकाने देण्याचा विषय महासभेत मंजूर केला होता. दर जास्त असल्याने व्यापारी या विरोधात न्यायालयात गेले होते. तसेच राज्य शासनाकडे हा विषय निलंबित करण्यात आल्याने पुन्हा तीन वर्षाच्या कराराला महासभेत मंजुरी मिळाली. असे असतानाही प्रशासनातर्फे व्यापार्यांना नोटीस बजावल्या आणि त्याची सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला. त्यातही व्यापार्यांची फिरवा फिरव सुरू असल्याने संतप्त व्यापार्यांनी महापालिकेवर धडक दिली.
अधिकार्यांकडून दिलगिरी
सकाळी 10 वाजता व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अशोक मंधान, उपाध्यक्ष अरुण माळी, सेक्रेटरी रमेश कापुरे, अनिल आर्या, अशोक मताणी, रमेश मताणी यांच्यासह अन्य व्यापारी तसेच त्यांचे वकील अँड. एस. बी. अग्रवाल आयुक्तांच्या भेटीसाठी गेले मात्र आयुक्त आलेले नव्हते. दोन्ही उपायुक्तदेखील नसल्याने व्यापारी बराच वेळ फिरले. अखेर नगररचना विभागाचे सहायक संचालक अनंत धामणे यांनी दुसर्या मजल्यावरील सभागृहात बोलवून व्यापार्यांशी चर्चा केली. सुनावणीच्या तारखांमध्ये झालेल्या बदलाबाबत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.
व्यापार्यांचा छळ सुरूच
महापालिकेतर्फे व्यापार्यांना सुनावणीसाठी सोमवारी वेळ दिली होती, ऐनवेळी वेळ बदलण्यात आली. नोटीस देतांना प्रत्येक व्यापार्यांच्या नावे देण्यात आली, तारीख बदलासंदर्भातील ताण वाचविण्यासाठी केवळ संघटनेच्या अध्यक्षांना पत्र देण्यात आले. व्यापार्यांनी तारीख बदलवून मागितली असती तर त्यांनी दिली नसती. व्यापार्यांचा एक प्रकारे हा छळ सुरू आहे. अशोक मंधान, अध्यक्ष; सेंट्रल फुले मार्केट असोसिएशन
सह्याजीरावांना टाळण्यासाठी आयुक्तांनी मारली दांडी
घरकुल प्रकरणात सह्या केल्याच्या कारणावरून अडचणीत सापडलेले सह्याजीराव घरकुलाच्या कारवाईमुळे जळगावकरांना परिचित झाले आहेत. मात्र, पालिकेत सह्या करणारे नव्हे तर करवून घेणार्यांनी आयुक्तांना सोमवारी रात्री उशिरापर्यंत वेठीस धरल्याने दुसर्या दिवशी कटकट नको म्हणून बोखडांनी कार्यालयीन कामकाजाला दांडी मारली. सोमवारी रात्री उशिरापर्यंत कार्यालयात थांबून असलो तरी मोजक्याच फाइलींवर सह्या केल्या. मंगळवारी भेटणार्यांनी घरीच गर्दी केल्याने कार्यालयात जाणेच जमले नसल्याचे आयुक्त बोखड यांनी सांगितले.
क्षतोडप्रकरणी भाजपने काढला महापालिकेवर मोर्चा
जागतीक पर्यावरण दिनी भारतीय जनता पक्षातर्फे मंगळवारी सायंकाळी महापालिकेतवर मोर्चा काढण्यात आला. याप्रकरणी उपायुक्त भालचंद्र बेहरे यांना निवेदन देण्यात आले. एक लाख वृक्षारोपणाचे उद्दीष्ठ देण्यात आले असतांना केवळ 25 हजार वृक्षांची मागणी करणार्या महापालिकेने शहरात वृक्ष तोडीचा सपाटा लावला आहे. शहरात कागदोपत्री वृक्ष लावली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. भाजपाचे गटनेते सुरेश भोळष, दीपक फालक, सुनील माळी, महानगराध्यक्ष अरुण बोरोले, दीपक साखरे, नगरसेवक अशोक लाडवंजारी, वैशाली पाटील, उज्वला बेंडाळे, प्रशांत नाईक यांच्यासह अन्य पदाधिकारी मोर्चात सहभागी झाले होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.