आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जळगाव- पालिका निवडणूक प्रक्रियेतील प्रभाग रचनेच्या गोपनीयतेचा भंग केल्यामुळे आयुक्त संजय कापडणीस यांचा आपल्याच कर्मचार्यांवरील विश्वास घटल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळेच बैठकीनिमित्त मुंबईला जाण्यापूर्वी त्यांनी आपलेच दालन व सभागृह कागद चिटकवून सील केले आहे.
महापालिका निवडणुकीशी निगडित गोपनीयतेचा भंग झाल्यानंतर प्रस्तावात फेरफार केल्याचे उघडकीस आल्यानंतर आयुक्त कापडणीस यांनी चार जणांना तडकाफडकी निलंबित करून उपायुक्त भालचंद्र बेहेरे यांच्यासह 14 जणांना आतापर्यंत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. निवडणुकीच्या प्रभाग रचना सत्ताधार्यांच्या दडपणाखाली तयार करण्यात आल्याचा आरोप यापूर्वीच भाजपने केला असून निवडणूक आयोगाने ती रद्द करावी अशी मागणी केली आहे. एकंदर प्रशासनातील अधिकारी, कर्मचार्यांचाच यात हात असल्याच्या कारणावरून तसेच निवडणूक आयोगाने घेतलेल्या आक्षेपानंतर आयुक्तांकडून कारवाईचे सत्र सुरू झाले आहे. त्यात दोषी असलेल्या कर्मचार्यांचे जबाब नोंदवून त्यांच्याविरुद्ध दोषारोप तयार करण्यात आले. ही माहितीदेखील अत्यंत गुप्त असल्यामुळेच तसेच निवडणुकीशी संबंधित माहिती असल्याने त्यात कोणीही ढवळाढवळ करू नये या उद्देशानेच आयुक्तांनी स्वत:ची कॅबिन व शेजारचा मिटिंग हॉल सील केला आहे. पांढरा कागद चिटकवून त्यावर स्वाक्षरी करून 6 जुलै नमूद केले आहे. एकंदर आपल्या कर्मचार्यांकडून कागदपत्रांमध्ये ढवळाढवळ होण्याची आयुक्तांना भीती वाटू लागलीय!
डॉ.गेडाम यांनीही घेतली होती ‘सील’ची काळजी
सन 2006 मध्ये तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी घरकुल संदर्भात फिर्याद दिल्यानंतर त्यासंदर्भातील माहिती आपल्याच दालनात ठेवली होती. रात्री उशिरापर्यंत कामकाज चालत असल्याने डॉ. गेडाम यांनीदेखील महत्त्वाच्या दस्तऐवजामध्ये कोणाचा हस्तक्षेप होऊ नये म्हणून अशा प्रकारची काळजी घेतली होती.
कर्मचारी धास्तावलेले
आयुक्तांनी कारवाईचा धडाका लावल्यानंतर निवडणुकीशी संबंधित माहिती देताना कर्मचारी सावध भूमिका घेत असून ताकसुद्धा फुंकून पित असल्याचेच निदर्शनास येत आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.