आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वॉर्डाच्या तोडफोडीच्या भीतीने धास्तावले अल्पसंख्याक नेते

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- गेल्या काही वर्षाचा अनुभव पाहता शहरातील अल्पसंख्याक समाजातील नगरसेवकांच्या संख्येत सातत्याने घट होत असल्याचे चित्र आहे. यामागे नेहमी वॉर्डांची सोयीने होणारी तोडफोडच जबाबदार असल्याचा निष्कर्ष काढला जात आहे. आगामी निवडणुकीत हा आणखी कमी होईल अशी चिंता व्यक्त होत आहे. या भीतीपोटीच धास्तावलेल्या नेत्यांनी महापालिकेच्या निवडणुकीदरम्यान सतर्क राहत न्यायासाठी झगडण्याची तयारी दर्शवली आहे.

मूव्हमेंट फॉर पीस अँण्ड जस्टिस व मौलाना मुहंमद अली जाहर बहुउद्देशीय संस्थेतर्फे ‘वॉर्ड रचना का, केव्हा व कशी’ या विषयावर रविवारी चर्चासत्र झाले. यानिमित्ताने उपस्थितांची संख्या आश्चर्य व्यक्त करण्यास भाग पाडणारी होती. यावेळी झालेली चर्चा आणि मते-मतांतरे यावरून अल्पसंख्याक समाजात महापालिका निवडणुकीबाबत झालेली जनजागृती कौतुकास्पद होती. शहरात मुस्लिमांची मते त्या तुलनेत असलेले नेतृत्व अत्यंत कमी असल्याचा विचार आवर्जून मांडण्यात आला.

वेळेवर न्याय मागा
महापालिका निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शासनाने लोकसंख्येची माहिती मागवली आहे. प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर नागरिकांच्या हरकती मागवल्या जातील. त्यात जर कोणाला शंका असल्यास त्यांनी वेळेवर अर्ज करून हरकत नोंदवावी. वेळेवर न्याय मागावा अन्यथा नंतर नाराजी व्यक्त करून काहीही उपयोग नाही, असे मत अँड. अकील इस्माईल यांनी व्यक्त केले. अल्पसंख्याकासंदर्भात कायदा काय म्हणतो यावर देखील चर्चासत्रात चर्चा करण्यात आल्याने पालिका निवडणुकीत काही अडचण आल्यास आगामी काळात कायद्याची लढाई लढण्याचीसुद्धा तयारी असल्याचे जाणवले.

मुस्लिम नेतृत्वाच्या अस्तित्वावर चर्चा
अध्यक्षस्थानी अब्दुल रऊफ तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून बर्‍हाणपूर येथील डिलिमिटेशन स्कॉलर वसीम सागर होते. प्रमुख पाहुणे म्हणून अँड. अकील इस्माईल होते. वसीम सागर यांनी पूर्वी एससी व एसटीचे 120 खासदार होते. त्यात 11ने वाढ करण्यात आली. त्यासाठी 499 मतदार संघ विस्कटले गेले. त्यामुळे आठ मुस्लिम खासदार कमी झाले. सन 2004मध्ये 37 खासदार; तर सन 2009मध्ये 29 खासदार झाले होते. आता तर महाराष्ट्रात एकही मुस्लिम खासदार नाही.

मुस्लिम वॉर्डांवर लक्ष केंद्रित
2003च्या निवडणुकीत मुस्लिम समाजाचे 10 नगरसेवक होते. 2008 मध्ये त्यांची संख्या चारवर आली आहे. त्यात करीम सालार यांच्या रूपाने एक स्वीकृत नगरसेवकाची वाढ झाली. दिवसेंदिवस अल्पसंख्याक नेतृत्व घटत आहे. त्यामुळे आगामी काळात प्रभाग रचनेदरम्यान मुस्लिम वॉर्डांची तोडफोड टाळण्यासाठी प्रयत्न करण्याचा सूर निघाला.