आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव: सत्ताधारी आघाडी ‘मराठा कार्ड’ वापरण्याच्या तयारीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- सर्वच राजकीय पक्ष जातीय गणिते आखत असताना महापालिकेतही महापौर निवडीच्या निमित्ताने तशीच गणिते मांडली जाऊ लागली आहेत. त्यामुळेच सत्ताधारी खान्देश विकास आघाडी या वेळी निवडणुकीच्या तोंडावर ‘मराठा’कार्ड वापरण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे.

राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि भाजपतर्फे संघटनात्मक निवडणुकीत शहराच्या नेतृत्वाची जबाबदारी लेवा समाजाकडे देण्यात आली आहे. खान्देश विकास आघाडीतर्फे देखील महापौरपदावर आधी विष्णू भंगाळे आणि त्यांच्यानंतर जयर्शी धांडे या लेवा समाजाच्या उमेदवारांना संधी देण्यात आली होती. शहरातील लेवा समाजाचे संख्याबळ हे त्यामागचे सबळ कारण आहे. महापालिका आणि त्यापाठोपाठ येणार्‍या विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून सर्वच राजकीय पक्ष हे निर्णय घेत आहेत, हे उघड आहे.

लेवा समाजाचे मतदान प्रभावी असले तरी मराठा समाजाचेही तुल्यबळ मतदान असून त्या समाजाकडेही दुर्लक्ष होऊ नये, अशी महापालिकेतील सत्ताधारी गटाची धारणा आहे. त्यामुळेच महापौरपदासाठी या वेळी खान्देश विकास आघाडी मराठा कार्ड वापरण्याची तयारी करीत असल्याचे जाणकारांचे मत आहे. विद्यमान महापौर जयर्शी धांडे आठवडाभरात पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन महापौरपदासाठी पुन्हा किशोर पाटील व सुनील महाजन यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. नवीन महापौर निवडीसंदर्भात आमदार सुरेश जैन हेच अंतिम निर्णय घेतील, असे सत्ताधार्‍यांकडून सांगितले जात असले तरी येत्या आठवड्यात आघाडीच्या स्थानिक नेत्यांची बैठक होऊन महापौरपदासाठीच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

लेवा पाठोपाठ मराठा कार्ड
आमदार सुरेश जैन यांच्या तालमीत लेवा व मराठा समाजासोबतच अन्य समाजाचे अनेक कार्यकर्ते तयार झाले आहेत. सोबत असलेल्या सर्व समाजाला सत्ताधारी गटाकडून नेतृत्वाची संधी मिळाल्याचा इतिहास आहे. सहा महिन्यांपूर्वी धांडे यांच्यासोबत पुष्पा पाटील यांच्या नावाची चर्चा होती; परंतु त्या वेळी सौ.पाटील यांना स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती. त्यामुळे शहरातील मराठा समाजाला आकर्षित करण्याच्या उद्देशाने आता किशोर पाटलांच्या रूपाने मराठा कार्ड वापरले जाण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास या पंचवार्षिकमध्ये पहिल्यांदा मराठा समाजाला महापौरपदाची संधी मिळणार आहे.

कोणाला मिळणार संधी?
महापौरपदासाठी स्पर्धेत असलेले किशोर पाटील हे सुनील महाजन यांच्यापेक्षा महापालिकेत अनुभवाने ज्येष्ठ आहेत. सुनील महाजन पहिल्यांदाच नगरसेवक झाले असले तरी ते सत्ताधार्‍यांच्या जवळचे मानले जातात. किशोर पाटील यांनी यापूर्वी नियोजन विभागाचे सभापती पद भूषवले आहे. तसेच शहराच्या विकासाच्या दृष्टीने त्यांचा अभ्यास सत्ताधारी जाणून आहेत. सुनील महाजन हे तरुण असून मेहरूण परिसरात त्यांचे राजकीय वर्चस्व आहे. शहरात बहुसंख्येने असलेल्या लेवा समाजाचे नेतृत्व म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जात आहे; परंतु विष्णू भंगाळेंपाठोपाठ सलग जयर्शी धांडे यांच्या रूपाने लेवा समाजाला संधी दिल्याने पुन्हा लेवा समाजाचाच महापौर करण्याचे सत्ताधारी टाळतील, असा अंदाज आहे.