आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव पालिकेतून ‘धनुष्य’ होणार बाद; महापौरांची पत्नी निवडणूक रिंगणात?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- महापालिका निवडणुकीत खान्देश विकास आघाडीसोबत असलेल्या शिवसेनेला यंदा धनुष्य चिन्हापासून दोन हात लांब रहावे लागणार आहे. सभागृहात नेतृत्व करण्याची संधी मिळणार असली तरी शिवसेना म्हणून नव्हे तर ‘विमान’ चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे. त्यामुळे पालिकेतून धनुष्य बाद होणार असल्याचेच चित्र आहे.

निवडणूक कोणतीही असो, त्यात राजकीय पक्षांच्या चिन्हांना प्रचंड महत्त्व असते. निवडणुकीनिमित्ताने होणारा प्रचार व प्रसारामुळे पक्ष वाढीला संधी मिळत असल्याचे राजकारणी नेहमीच सांगतात. शहराने बर्‍याचदा वेगवेगळ्या चिन्हावर लढणार्‍या आमदार सुरेश जैन यांना निवडून दिले आहे. आता शिवसेनेचे आमदार असले तरी त्यांच्या नेतृत्वाखालील खान्देश विकास आघाडीच्या माध्यमातून पालिका निवडणूक लढवली जाणार आहे. त्यामुळे साहजिकच शिवसेनादेखील त्यांच्या आघाडीसोबतच राहणार आहे. खान्देश विकास आघाडी व शिवसेना हे एकच असल्याचे सांगितले जात असले तरी वैचारीकदृष्ट्या ते वेगवेगळे असल्याचे मानले जाते. त्यामुळे शिवसेनेच्या माध्यमातून निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांची चाचपणीसुद्धा केली होती.

वरिष्ठांच्या उपस्थितीत निर्णय
मनसतर्फे सोमवारपासून इच्छुक उमेदवारांना अर्ज वितरण होणार असल्याची माहिती पक्षाचे संपर्क अध्यक्ष विनय भोईटे व गजानन राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. निवडणुकीच्या दृष्टीने परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आमदार प्रवीण दरेकर, महिला प्रदेश अध्यक्षा शालिनी ठाकरे, नितीन भोसले शनिवारपासून येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत पालिका निवडणुकीसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय होणार आहे. किती जागा लढवायच्या? यासंदर्भात अद्याप निर्णय झालेला नाही. स्वबळावर लढण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याचे विनय भोईटे यांनी सांगितले. या वेळी ललित कोल्हे, जमील देशपांडे उपस्थित होते.

हरिविठ्ठलनगरातून उमेदवारीच्या हालचाली
महाबळ परिसरात दोन टर्म निवडून आलेले विद्यमान महापौर किशोर पाटील यांचा आपल्या वॉर्डाव्यतिरिक्त इतर भागातही दांडगा संपर्क आहे. त्याचा फायदा घेत त्यांच्या पत्नी माधुरी पाटील यांना हरिविठ्ठलनगर परिसरातून पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

यंदा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50 टक्के महिलांना संधी दिली गेल्याने सर्वच पक्षांची गोची झाली आहे. त्यातच जातीय समीकरणानुसार सक्षम उमेदवार शोधताना पक्षप्रमुखांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे महिला आरक्षणावर तोडगा काढत विद्यमान नगरसेवक व प्रस्थापित घराण्यांतील सुशिक्षित महिलांना संधी देण्याचा विचार होत आहे. त्यानुसार विद्यमान महापौर पाटील यांच्या प}ी माधुरी पाटील यांनी वॉर्ड क्रमांक 16मधून निवडणूक लढावी म्हणून हालचाली सुरू आहेत. एकूण 10 हजार 142 मतदार असलेल्या या वॉर्डात अनुसूचित जातीचे 870 व अनुसूचित जमातीचे 947 मतदार आहेत. त्यामुळे आरक्षण सोडतीत एक जागा पुरुष सर्वसाधारण, तर दुसरी जागा अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव आहे. या वॉर्डातून माधुरी पाटील यांना संधी देऊन महापौरांच्या जनसंपर्काचा फायदा करून घेण्याचा विचार सुरू आहे.