आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव: नगरसेवकांचं ‘गुणपत्रक’: मूल्यमापनाचा वस्तुनिष्ठ प्रयत्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव शहरातील सुज्ञ नागरिकांनो, तुम्ही-आम्ही निवडून दिलेल्या नगरसेवकांचा कार्यकाळ जवळपास पूर्ण झाला आहे. येत्या काही दिवसांत त्यांच्यातीलच बहुतेक जण पुन्हा मत मागायला नागरिकांकडे येणार आहेत. आपणही या शहराचे जबाबदार नागरिक असल्यामुळे आपल्याला मतदान करायचंच आहे; पण हे मतदान करताना ते ‘सत्पात्री’ म्हणजे योग्य उमेदवाराच्या पदरात पडायला नको का आणि ते सत्पात्री पडावंच तर कोण योग्य, कोण अयोग्य हे ठरवता येणं महत्त्वाचे आहे.

कसं ठरवायचं नगरसेवक म्हणून कोणी योग्य भूमिका निभावली आणि कोणी नाही ते? आम्ही त्याचा विचार केला आणि बनवलं नगरसेवकांचं ‘गुणपत्रक’. हे गुणपत्रक म्हणजे विद्यमान नगरसेवकांचं सर्वांगाने केलेलं वस्तुनिष्ठ मूल्यमापन असेल याची आम्ही काळजी घेतली आहे. त्यासाठी नगरसेवक म्हणून प्रतिनिधी निवडण्यामागच्या उद्देशालाच आम्ही सर्वाधिक महत्त्व दिलं आहे. नगरसेवक निवडण्यामागचा उद्देश सफल होण्यासाठी जे काही निकष आवश्यक आहेत त्यांना आम्ही त्यांच्या महत्त्वानुसार गुण निश्चित केले आणि ते निकष किती प्रमाणात पूर्ण केले आहेत हे पाहून गुणांकन केले आहे. काही तांत्रिक बाबींबरोबरच त्या भागातील मतदारांचं समाधान आणि भावना यांनाही महत्त्व दिलं आहे. त्यासाठी त्या त्या प्रभागातील सर्व क्षेत्रातल्या प्रातिनिधिक नागरिकांना भेटून त्यांची मते जाणून घेतली आहेत. त्यात सुशिक्षित आहेत आणि अल्पशिक्षितही, गरीब आहेत आणि र्शीमंतही, नोकरदार आहेत आणि व्यावसायिकही, पुरुष आहेत तशा स्त्रियाही. अर्थात, तरीही हे गुणपत्रक म्हणजे त्या उमेदवाराच्या जय-पराजयाचं भाकीत नाही की प्रचार किंवा बदनामीचं हत्यार नाही. संबंधित नगरसेवकांनी दिलेली माहिती, पालिकेतून कागदपत्रांसह उपलब्ध झालेली माहिती आणि त्या त्या प्रभागातल्या नागरिकांकडून मिळालेला प्रतिसाद यावर आधारित हे गुणपत्रक आहे.

नगरसेवक हा खर्‍या अर्थाने त्या प्रभागातील नागरिकांचा प्रतिनिधी असावा यासाठी तो त्यांच्याजवळ म्हणजे प्रभागातच राहात असला पाहिजे, नागरिकांच्या समस्या त्याच्यापर्यंत पोहोचवणे नागरिकांना शक्य व्हावे यासाठी नगरसेवकाची संपर्काची निश्चित अशी जागा आणि वेळ असावी, त्याच्याशी इतरवेळी संपर्कासाठी दूरध्वनी असावा यालाही हे गुणपत्रक बनवताना महत्त्व दिलं आहे. महापालिकेतील सहभाग, विकासकामे खेचून आणण्याची क्षमता, चारित्र्य, ज्ञान यांनाही आवश्यक ते महत्त्व दिलं गेलं आहे. त्यामुळे हे गुणपत्रक आपल्या नगरसेवकांचं मूल्यमापन करायला मतदारांना तर मदत करेलच; पण विद्यमान आणि भावी नगरसेवकांनाही ते येत्या पंचवार्षिक कारकिर्दीसाठी दिशादर्शक ठरू शकेल, असा विश्वास वाटतो.