आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चिन्हांकित मतदारांचा लागणार कस; खंडपीठाचा हस्तक्षेप करण्यास नकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेली प्रभाग रचना चुकीची असून निवडणूक पुढे ढकलण्यासंदर्भात दाखल याचिकेत औरंगाबाद खंडपीठाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला. निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशांचे सक्त पालन करून पारदर्शक निवडणूक होईल, याची काळजी घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे चिन्हांकित करण्यात आलेल्या 67 हजार 676 मतदारांचा मतदानावेळी चांगलाच कस लागणार आहे.

पालिकेच्या निवडणुकीत बोगस मतदार समाविष्ट केल्याची तक्रार निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे दाखल करत नगरसेवक नरेंद्र पाटील, भाजपचे महानगराध्यक्ष सुरेश भोळे, माजी नगरसेवक प्रदीप रोटे यांनी 19 जुलै रोजी औरंगाबाद खंडपीठात याचिका क्रमांक 5859/2013 दाखल केली होती. त्यात प्रभाग रचना चुकीची झाली आहे. बोगस मतदार असल्याने चिन्हांकित मतदारांना मतदानाचा अधिकार न देता निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्याची विनंती केली. त्यावर न्यायमूर्ती आर.एम.बोर्डे व आर.व्ही.घुगे यांच्या न्यायासनासमोर बुधवारी कामकाज चालले. त्यात न्यायालयाने प्रभाग रचना चुकीच्या जनगणनेनुसार झाल्याच्या मुद्दा लावून धरता येणार नाही. निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले. निवडणूक आयोगातर्फे पत्त्यावर आढळून न आलेल्या 67 हजार 676 मतदारांची यादी सादर करण्यात येऊन, अशा मतदारांच्या नावासमोर चिन्ह देण्यात आल्याचे सांगितले. तसेच या मतदारांना मतदान करताना सक्त पुरावे देणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. अशा चिन्हांकित मतदारांवर निवडणूक आयोगाचे बारीक लक्ष असल्याचेही सांगितले.

जादा पुराव्यांची होणार तपासणी
चिन्हांकित मतदारांना मतदान करताना ज्या घरात राहतात त्या घराची घरपट्टी भरल्याची पावती, टेलिफोन व वीज बिलाची पावती तसेच पत्ता असलेले आधार कार्ड यासारखे पुरावे सादर करावे लागणार आहेत. खंडपीठाने देखील पुराव्याशिवाय मतदान करू देऊ नये, असे निर्देश दिले. तसेच नरेंद्र पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेत हस्तक्षेप न करता निकाली काढली. राज्य निवडणूक आयोगातर्फे अँड. उदय मालते तर याचिकाकर्त्यांतर्फे अँड. कातलेश्वरकर यांनी काम पाहिले.