आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ओळखपत्र द्या, पैसे घ्या; मते मिळविण्यासाठी मांडला बाजार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


जळगाव- ‘तुम्ही मतदार आहात? मग त्याचा पुरावा असलेलं निवडणूक आयोगाचं ओळखपत्र, आधार कार्ड आणि रेशन कार्ड आमच्याकडे द्या आणि एका मताचे दोन हजार रुपये घ्या,’ अशी योजना शहरात काही उमेदवारांकडून सुरू झाली असून त्यातून मोठय़ा प्रमाणात ओळखपत्र आणि रेशन कार्ड संकलित करण्यात आल्याची माहिती समोर येते आहे. रात्री उशिरा राबवल्या जाणार्‍या या मोहिमेत लोकशाहीच वेठीस धरली जात असून हा प्रकार थोपवण्यासाठी धडक मोहीम राबवण्याची आवश्यकता आहे.

मतदान आपल्याला व्हावे यासाठी पालिका निवडणुकीतील अनेक उमेदवारांकडून प्रत्येक मतासाठी काही भागात पैसे वाटले जातात आणि त्याचा दर चार ते पाच हजार रुपयांपर्यंत पोहोचतो हे आता उघड गुपित बनलं आहे.

याच पैशांच्या बळावर निवडून आलेल्या अनेक नगरसेवकांनी गेल्या पाच वर्षांत प्रभागात काहीही कामं तर केली नाहीतच; पण कामांची मागणी करणार्‍या मतदारांना त्यांची मतं विकत घेतली असल्याचं सुनावल्याचीही उदाहरणं आहेत. त्या पार्श्वभूमीवर यंदाही तो ‘फंडा’ काही उमेदवारांनी सुरू केला असून रात्री पैसे वाटप आणि ओळखपत्र ताब्यात घेण्याचे प्रकार सुरू झाल्याचे दूरध्वनी ‘दिव्य मराठी’ कार्यालयात येऊ लागले आहेत.

ओळखपत्रांची कस्टडी कशासाठी?
(राजकीय कार्यकर्त्यांच्या मते)
० पैसे मतदारापर्यंत पोहोचले याचा पुरावा संबंधितांना देण्यासाठी.
० त्या मतदाराला आपले मत अन्य उमेदवारांना ‘विकण्याची’ संधी राहू नये म्हणून.
० मतदाराला मतदान केंद्रापर्यंत जाण्याआधी आपल्याकडे यावे लागावे म्हणून.
० पैसे घेऊन मतदान करणे मतदाराने टाळू नये म्हणून.
० ज्यांचे मत आपल्याला मिळणारच नाही अशा मतदारांना मतदानापासून रोखण्यासाठी.
मतदारांचे नुकसान काय?
० मतदाराला आयुष्यभर उपयोगी पडणारी ही कागदपत्रे आहेत. ती गहाळ झाल्यास, परत न मिळाल्यास अनेक कामे अडू शकतात.
० अनेकदा फोटो बदलवून झेरॉक्स काढून अशा दस्तऐवजांचा गैरवापर गुन्हेगारांनी केल्याचे समोर आले आहे. तसे झाल्यास बदनामी आणि पोलिस चौकशीचा ससेमिरा मागे लागू शकतो.
० संबंधित उमेदवाराच्या कार्यालयावर, घरी छापा पडला आणि तिथे मतदाराचे ओळखपत्र सापडले तर कार्यकर्त्यांच्या जबाबावरून मतदानासाठी पैसे घेतल्याबद्दल कारवाईला सामोरे जावे लागू शकते.
० मत विकून लोकशाहीला विकलांग केल्याची भावना स्वाभिमानाला ठेच पोहोचवू शकते.

प्रशासनाला आळा कसा घालता येईल?
या प्रकाराला विरोध असणाºया जागृत नागरिकांनी तातडीने ‘दिव्य मराठी’बरोबरच निवडणूक विभागाच्या आचारसंहिता कक्षालाही दूरध्वनी करून त्याच वेळी माहिती द्यावी. त्यासाठी त्यांचा दूरध्वनी क्रमांक आहे -
(0257) 2222262

ज्या मतदारांचे कार्ड अशा उमेदवारांकडे सापडतील त्या मतदारांवर कायदेशीर कारवाईसाठी कठोर पाऊल उचलावे.
असा उमेदवार अथवा कार्यकर्ते आढळले तर तातडीने संबंधित उमेदवाराच्या कार्यालयावर, घरावर छापा टाकून संभाव्य कार्ड जप्तीची मोहीम राबवावी.

‘दिव्य मराठी’ ठेवते लक्ष
या प्रकारांना आळा घालण्याची जबाबदारी प्रशासनाची असली तरी अशा प्रकारांवर ‘दिव्य मराठी’ टीमही लक्ष ठेवून आहे. पुरावे हाती येताच कठोर कारवाईसाठी आग्रही भूमिका घेतली जाणार आहे.