आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रचार थांबला; आता मतदानासाठी सज्जता; निवडणुकीसाठी तीन हजार कर्मचार्‍यांची नियुक्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- पालिकेच्या तिसर्‍या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शुक्रवारी सायंकाळी 5.30 वाजता प्रचाराची मुदत संपल्याने दोन आठवड्यांपासून सुरू असलेले आरोप-प्रत्यारोपाचे वातावरण शांत झाले आहे. 75 जागांसाठी 405 उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीतील महत्त्वाचा मतदान प्रक्रियेचा टप्पा रविवारी पार पडणार असून यासाठी तीन हजार कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा शुक्रवारी सायंकाळी थंडावल्या. प्रचाराचा अखेरचा दिवस असल्याने काही उमेदवारांकडून मतदारांवर छाप पाडण्यासाठी मोठय़ा प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. प्रशासनातर्फे रविवारी होत असलेल्या मतदान प्रक्रियेसाठी मतदान यंत्रे वाटपाच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले. शहरात 433 मतदान केंद्र असून प्रत्येक केंद्रावर वीज, पाणी यासह इतर सुविधा देण्याच्या दृष्टीने प्रय} सुरू होते. मतदानासाठी 2 हजार 900 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

आज साहित्य वाटप
राज्य वखार महामंडळाच्या एमआयडीसीतील गोदामातून शहरातील मतदान केंद्रांवर शनिवारी सकाळी साहित्य वाटप करण्यात येणार आहे. कर्मचारी व साहित्य पोहोचवण्यासाठी एकूण 120 वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. यात 60 शासकीय वाहने, 30 खासगी वाहने, 21 राज्य परिवहन मंडळाच्या बस आणि 10 जेएमटीयूच्या बसचा समावेश आहे.

आचारसंहिता भंगाच्या तक्रारी
पालिकेचे कर्मचारी योगेश पाटील यांचे भाऊ रवींद्र पाटील वॉर्ड 28 ब मधून निवडणूक लढवत आहेत. पालिका कर्मचारी असताना योगेश पाटील प्रचारात सहभागी होत असल्याची तक्रार अजय जाधव यांनी केली आहे. तसेच भारतीय जनता पक्षातर्फे लाइव्ह प्रक्षेपण केले जात असल्याची तक्रार खाविआचे अध्यक्ष रमेश जैन यांनी केली आहे.

बंदोबस्तासंदर्भात आढावा
निवडणुकीसाठी शुक्रवारी बंदोबस्तासंदर्भात आढावा घेण्यात आला. अपर पोलिस अधीक्षक एन.अंबिका यांनी मार्गदर्शन केले. निवडणुकीसाठी 127 पोलिस अधिकारी, 450 कर्मचारी धुळे, नंदुरबार व नाशिक येथून आले आहेत. तर 1000 होमगार्ड, एसआरपीची एक कंपनी, 7 आरसीपी प्लाटून असा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

न्यायालयाच्या कामावर झाला परिणाम
दोन दिवसावर मतदान येऊन ठेपले आहे. त्यामुळे चोख बंदोबस्ताची तयारी सुरू आहे. अशा परिस्थितीत आरोपींना ने-आण करणे, समन्स बजावणे, साक्षीदारांसाठी पोलिस कर्मचार्‍यांची उपस्थिती राहू शकत नसल्याने न्यायालयातील अनेक कामे पुढील तारखा देऊन ढकलण्यात येत आहेत. यासंदर्भात पोलिस प्रशासनाकडून आलेल्या पत्रानुसार निवडणूक व त्यानंतर येणार्‍या गणेशोत्सवापर्यंत अशीच स्थिती राहणार असल्याने 20 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कामांवर काही प्रमाणात परिणाम जाणवणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.