आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Jalgaon Municipal Corporation Election Perpetration By Police

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महापालिका निवडणुकीची पोलिसांकडून पूर्वतयारी; हिस्ट्रीशिटर, तडीपार, वादग्रस्तांचा शोध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - येत्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेची तयारी आतापासूनच सुरू केलेली आहे. निवडणुकीच्या काळात ज्यांच्याकडून शहराच्या कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो. अशा लोकांच्या याद्या तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. पोलिस अधीक्षक एस. जयकुमार याकडे लक्ष देऊन आहेत. महापालिका निवडणुकांमध्ये राजकीय वादातून शहराच्या कायदा व सुव्यवस्थेला धोका पोहचण्याची दाट शक्यता असते. त्याशिवाय या काळात शहरात दंगामस्ती करणार्‍यांची संख्यादेखील अचानक वाढायला लागते. त्यामुळे या सर्वांवर नियंत्रण असावे व कायदा, सुव्यवस्थेची स्थिती अबाधित राहावी यासाठी पोलिसांनी तत्परतेने पावले उचलली आहेत.

तडीपारांची यादी तयार
गेल्या महापालिका निवडणुकीच्या वेळी कोणास तडीपार करण्यात आले होते. कोणत्या भागातील व्यक्ती उपद्रवी आहे. त्याला तडीपार करण्याची आवश्यकता आहे का? अशा व्यक्तींची माहिती पोलिस जमा करीत आहेत. मागील काळात उपद्रवी व्यक्तीवर किती गुन्हे दाखल आहेत. सध्याची त्याची परिस्थिती काय आहे?, तो जळगावात राहतो की इतर कुठे याच्या याद्या पोलिस तयार करीत आहेत. जिल्ह्यातून तडीपार करायचे आहे, त्यांची स्वतंत्र यादी पोलिस तयार करीत आहेत. यंदाच्या महापालिका निवडणुकीमध्ये गेल्या निवडणुकीच्या तुलनेत तडीपार करण्यात आलेल्यांची संख्या वाढणार आहे. घरकुल प्रकरणात वेगवेगळ्या अटकांच्या वेळी गोंधळ घालणारेदेखील पोलिसांच्या रडारवर आहेत. त्यामुळे अशा उपद्रवी लोकांवरदेखील कारवाई होऊ शकते. त्यामुळे तडीपारांचा आकडा निश्चितच वाढणार आहे.

बूथबाबत माहिती मागवणे सुरू
शहरात असलेल्या पाचही पोलिस ठाण्यांमध्ये गेल्या महापालिका निवडणुकीत झालेल्या राजकीय वादातून दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती पोलिस जमवित आहेत. त्याचबरोबर कोणत्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत किती बूथ असू शकतात. त्यातील किती बूथ संवेदनशील म्हणून ओळखले जातात, याचीदेखील माहिती पोलिस घेत आहेत.

उपद्रवींवर आतापासून नजर
शहराच्या हद्दीत राहणार्‍या व महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने उपद्रवी असलेल्यांवर पोलिसांनी आतापासूनच नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. हे उपद्रवी लोक काय करताहेत, ते कोणत्या राजकीय पक्षात सक्रिय आहेत. याची माहितीदेखील पोलिस मिळवित आहेत. शहरातील पाचही पोलिस ठाण्यांच्या गोपनीय विभागाला ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.