आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Jalgaon Municipal Corporation Election: Political Parties Fights Eachother

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जळगाव मनपा निवडणूक : राजकीय पक्षांच्या मुलांमधील वादाचे पर्यावसान गुद्यावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या पदाधिकार्‍यांच्या मुलांमध्ये झालेला वादाचे पर्यावसान रात्री निवडणूक प्रचाराच्या मुद्यावरून गुद्यावर आले. लोखंडी रॉड, काठय़ांनी होणारी सिनेस्टाइल हाणामारी थोडक्यात टळली. मात्र, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष गफ्फार मलिक आणि समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मुफ्ती हारुन नदवी यांच्यात रामानंदनगर पोलिस ठाण्यातच बाचाबाची झाली.


मलिक यांनी मुफ्तींना अपशब्द वापरल्यामुळे वाद चिघळला होता. पोलिस ठाणे परिसरापर्यंत गफ्फार मलिक यांच्या मुलासह 20 ते 25 सहकार्‍यांनी लोखंडी रॉड, लाठय़ा-काठय़ा आणल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी प्रसंगावधान राखल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.


गुरुवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास समाजवादी पक्षाच्या कोअर कमिटीचे चेअरमन साजीद शेख यांचा मुलगा फैजान आणि गफ्फार मलिक यांचे बंधू सईद मलिक यांचा मुलगा शारीक यांच्यात ओंकारेश्वर मंदिराजवळ हाणामारी झाली. यात फैजान किरकोळ जखमी झाला. त्याने साजीद शेख यांना ही माहिती दिल्यानंतर साजीद शेख, मुफ्ती हारुन नदवी यांच्यासह समाजवादीचे काही कार्यकर्ते शारीकवर गुन्हा दाखल करण्यास रामानंदनगर पोलिस ठाण्यात दाखल झाले. ही माहिती गफ्फार मलिक यांचा मुलगा नदीम याला मिळताच नदीम 20-25 कार्यकर्त्यांसह रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या परिसरात पोहोचला. नदीमने गाडीच्या डिक्कीत ठेवलेल्या लोखंडी आणि लाकडी रॉड काढून मुफ्ती हारुन यांच्यासह कार्यकर्त्यांवर चाल केली. तेवढय़ातच पोलिसांनी त्यांना रोखले. पोलिसांनी दोन्ही गटातील काही युवकांसह लाकडी, लोखंडी रॉड, नदीम मलिक यांची चारचाकी ताब्यात घेतली आहे. हा गोंधळ मिटविण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत बच्छाव घटानास्थळी उपस्थित झाले होते.


आझमींच्या सभेचे पडसाद
बुधवारी मेहरूण परिसरात आमदार अबू आझमी यांची सभा झाली. या सभेत आझमींसह मुफ्ती आदींनी आपल्या भाषणात गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याचा राग बाळगून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर चिडले होते. हा राग आज या भांडणाच्या निमित्ताने उफाळून आला आणि तो गफ्फार मलिक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत होता.


लोखंडी रॉडचा वापर
गुरुवारी झालेल्या या वादात नदीम मलिक यांच्या गटाने मारहाणीसाठी लोखंडी रॉड आणले होते. लहान मुलांचे भांडण बाजूला ठेवून दोन पक्षातील कार्यकर्त्यांचा वाद मोठय़ा हाणामारीच्या तयारीत असल्याचे संकेत यातून समोर आले आहे.


पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला
मुफ्ती रामानंद चौकीजवळ असताना एक गट त्यांच्यावर चाल करून येतो आहे ही बाब तिथे असलेल्या पोलिसांच्या लक्षात आली. त्यामुळे धावत जाऊन पोलिसांनी त्यांना वेळीच रोखले. त्यामुळे संभाव्य अनर्थ टळला, असे ही घटना प्रत्यक्ष पाहाणार्‍यांनी सांगितले.